बीड

हर घर नळ’ योजना की ‘हर घर फसवणूक’? जल जीवन मिशनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार?

हर घर नळ’ योजना की ‘हर घर फसवणूक’? जल जीवन मिशनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
 चौकशी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन – ॲड. डॉ. अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी:कर्जत-जामखेड तालुक्यातील जल जीवन मिशनअंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केली आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये जल जीवन मिशन योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कागदोपत्री योजना पूर्ण दाखवून ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचे बील अदा करण्यात आले असून, प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये अजूनही पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही.
जाधव यांनी आरोप केला की, या योजनेत अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक पुढाऱ्यांची साखळी तयार होऊन संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाईपलाइन केवळ एक ते दीड फूट खोलीपर्यंतच टाकण्यात आली असून, काही ठिकाणी पाईपच टाकले गेले नाहीत. टाटा समिती आणि भूजल सर्वेक्षण विभागानेही खोटे दाखले देऊन कामे उत्तम दर्जाची असल्याचा बनाव केला, असा आरोपही त्यांनी केला.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणतीही कारवाई न करता ठेकेदारांचे बील तातडीने अदा करण्यात आले. विशेष म्हणजे सार्वजनिक रस्त्यांवर पीडब्ल्यूडीची परवानगी न घेताच पाइपलाईन टाकण्यात आली असून, विहिरी, बोअरवेल, मोटर, विद्युत मोटर आदी कामे अंदाजपत्रकानुसार झालेलीच नाहीत.
या योजनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास “आत्ता नाही तर परत नाही” या घोषणेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर तालुक्यातील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, ऋषिकेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button