महाराष्ट्र

गुरुतेगबहादूरांच्या शौर्यस्मृतींना मानाचा मुजरा; डिजिटल चित्ररथाने अमरावतीत उभारला जागरूकतेचा सोहळा

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती :
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राष्ट्रभर साजरा होणाऱ्या स्मृती-समारंभांची ज्योत आता अमरावतीतही प्रज्वलित झाली आहे. शौर्य, त्याग आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या भव्य डिजिटल चित्ररथाचे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आगमन होताच वातावरण भक्तीभावाने भारावून गेले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी विधिवत हिरवी झेंडी दाखवत या चित्ररथाच्या प्रवासाला प्रारंभ केला. उपस्थित मान्यवरांनी चित्ररथावरील प्रेरणादायी चित्रफितींची पाहणी करत, “त्यागाची परंपरा आणि सत्यासाठीचे रणांगण” अशा भावमय अनुभूतीचा अनुभव घेतला.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सलुजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाज प्रतिनिधींची उपस्थिती लाभली.

हा डिजिटल चित्ररथ पुढील काही दिवस अमरावती जिल्ह्यातील विविध भागांत फिरून, 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भव्य समागमाबाबत जनजागृती करणार आहे.

गुरुतेगबहादूरांच्या अदम्य त्यागाची गाथा जनमानसापर्यंत पोहोचवणारा हा चित्ररथ, जिल्ह्यात एका आध्यात्मिक आणि संस्कारित उत्सवाची नांदी ठरत आहे.

Back to top button