बीड
डीजे बंदी विरोधात अंबाजोगाई साऊंड-लाईट, मंडप व जनरेटर व्यावसायिक आक्रमक

डीजे बंदी विरोधात अंबाजोगाई साऊंड-लाईट, मंडप व जनरेटर व्यावसायिक आक्रमक
*राजकीय, शासकीय, खाजगी कार्यक्रमाला सेवा न देण्याचा निर्णय*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-पोलिस प्रशासनाने डीजेवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा निषेध करीत अंबाजोगाई साऊंड लाईट, मंडप व जनरेटर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही राजकीय, शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांना साऊंड, लाईट, जनरेटर, फोकस, मंडप, वायर, डेकोरेशनसह कोणतेही साहित्य पुरविणार नाही, असा ठराव करण्यात आला.
असोसिएशनने स्पष्ट इशारा दिला की, जर कोणत्याही व्यावसायिकाने साहित्य पुरविलेच तर त्यावर असोसिएशनकडून कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर असे साहित्य थेट जप्त करण्यात येईल. याचा पहिला प्रयोगही आज करण्यात आला. शहरातील एका दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेले साऊंड व मंडप साहित्य असोसिएशनने जप्त करून आणले. मंडप साहित्य असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अशोक बलुतकर, उपाध्यक्ष राजाभाऊ कोंबडे, कोषाध्यक्ष अर्जुन गवळी, सचिव अशोक गोचडे तसेच अंबाजोगाई तालुका साऊंड असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सतिश केंद्रे, उपाध्यक्ष संतोष साबणे, कोषाध्यक्ष कृष्णा वाघमारे आणि सचिव प्रविण कराड या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही स्वच्छ, मर्यादित वाजणारा साऊंड वापरून व्यवसाय करतो. मात्र पोलिस प्रशासनाने कोणती ही शिस्तबद्ध तडजोड न करता थेट बंदी घातल्याने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, डीजेचा वापर पूर्णतः बंद असला तरी आमचा व्यवसाय साऊंड, लाईट, मंडप व जनरेटर यावर अवलंबून आहे. प्रशासनाकडून बंदी कायम राहिली तर ज्यांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे असे शेकडो ऑपरेटर, वायरमन, ड्रायव्हर, साऊंड इंजिनिअर यांच्यासह अनेक तंत्रज्ञ, कामगार यांच्या कुटुंबातील हजारो नागरिक हे उपासमारीला सामोरे जातील. यावेळी अंबाजोगाई तालुका साऊंड, मंडप, लाईट व जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी इंजिनिअर मयुर परदेशी, नागेश गुजर, माऊली शेप, सुनिल कलशेट्टी, गोरख जगताप, अनिकेत डाके, बालाजी मारवाळ, विशाल व्हावळे, उदय पाटील, गोरक्ष खोडवे, अभिषेक धायगुडे, कुणाल भोसले, अजय सुरवसे, अमित तरकसे, समाधान गायकवाड, रवि मारवाळ, अनिकेत सपकाळ, ओम काळे, प्रेम व्हावळे, ऋषिकेश काळे, विकास क्षिरसागर, केशव गुट्टे, अमित व्हावळे, ऋतुराज धायगुडे, सचिव पवार यांच्यासह 80 हून अधिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अंबाजोगाई साऊंड-लाईट मंडप व जनरेटर असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरासह तालुक्यातील राजकीय, शासकीय व खासगी कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसांत विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम, उद्घाटने, राजकीय व शासकीय कार्यक्रमांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



