महाराष्ट्र

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा; -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

अमरावती: शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी लोकसहभागातून व्यापक योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन निधीमधून राबविण्यात येणारी ही योजना लोकसहभाग व शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने साकारली जाणार आहे. शेतकऱ्यांना बारामाही शेत रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रति किलोमीटर ९ लाख रुपये खर्च निश्चित करण्यात आला असून, यापैकी ७.५ लाख रुपये शासनाकडून आणि उर्वरित १.५ लाख रुपये लोकसहभागातून उभारले जाणार आहेत.

या योजनेचा पथदर्शी प्रकल्प अंजनगाव सुर्जी तालुक्यात राबविण्यात येणार असून, तेथे २० किलोमीटर पांदण रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. उर्वरित सहा तालुक्यांत प्रत्येकी ५ किलोमीटरप्रमाणे एकूण ३० किलोमीटर शेत पांदण रस्ते तयार होणार आहेत. या कामासाठी ‘लोकजागर’ या स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, पांदण रस्ते मोकळे करताना जल पुनर्भरणालाही चालना मिळणार आहे.

योजनेअंतर्गत ५ किलोमीटरच्या आतील नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर पांदण रस्त्यांसाठी करण्यात येणार असून, हे साहित्य स्वयंसेवी संस्थांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील शेत रस्त्यांचे जाळे बळकट होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.

Back to top button