बीड
तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी आश्रय सेवा केंद्राचा पुढाकार.!

तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी आश्रय सेवा केंद्राचा पुढाकार.!
हक्काचे घर, स्वतंत्र स्मशानभूमी आणि रोजगाराच्या संधींसाठी प्रशासनाकडे पत्रकार शेख आयेशा यांच्यासह तृतीयपंथीयांचे निवेदन
बीड जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक तृतीयपंथीयांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न ऐरणीवर
बीड प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असताना तृतीयपंथीय समाजाला आजही निवारा, रोजगार, आरोग्य सुविधा आणि अंत्यसंस्कारासाठी संघर्ष करावा लागत आहे. या समाजाच्या मूलभूत हक्कांना न्याय मिळावा, यासाठी आश्रय सेवा केंद्र बीडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून हक्काचे घर बांधण्यासाठी शासकीय जागा आणि अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा पत्रकार शेख आयेशा यांनी २५ नोव्हेंबर रोजी हे निवेदन असंख्य तृतीय पंथीयांसमवेत जिल्हाधिकारी बीडचे तहसीलदार आणि बीड नगर परिषद यांच्याकडे सादर केले.
तृतीयपंथीयांसाठी बीडमध्ये स्वतंत्र स्मशानभूमी साठी जागा आणि राहण्यासाठी शासनाने घरकुल द्यावेत विशेष बाब म्हणून घरासाठी शासकीय विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, बीडचे तहसीलदार, नायब तहसीलदार सुहास हजारे, बीड नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते खुर्शीद आलम यांच्याकडे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा तथा पत्रकार शेख आयेशा यांच्यासह सर्वश्री तृतीयपंथीय सपना धुताडमल, गौरी शिंदे, सलोनी कदम, जोया शेख, राजया गायकवाड, नेहा म्हात्रे, शेख अलिष, रोशनी धुताडमल, मुस्कान अत्तार,सय्यद समीरा, शेख मलाईका, छाया कोकणे, शितल साठे, अमृता, नवले प्रज्ञा, आलिया सय्यद, शेख मुस्कान, मयुरी कांबळे, सानिया शेख, रावी अंकुटे, साई सुधार, नंदाबाई, करीनाबाई आदींसह तृतीयपंथीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांची संख्या जवळपास एक हजारांपेक्षा अधिक असून बीड शहरासह माजलगाव, गेवराई, आष्टी, केज, परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये हा समाज वास्तव्यास आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा, सन्मानाने जगण्याचा आणि निवाऱ्याचा अधिकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नालसा निवाडा २०१४ नुसार तृतीयपंथीयांना तृतीय लिंग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ नुसार त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या सुविधा मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे.मात्र प्रत्यक्षात या समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राहण्यासाठी कायमस्वरूपी घर नसल्याने भाड्याच्या घरात राहावे लागते. अनेक ठिकाणी घरमालकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. नोकरी, मजुरी, दुकानातील काम किंवा इतर रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. समाजाकडून टोमणे, शिवीगाळ, मारहाण, लैंगिक शोषण आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा निवेदनात मांडण्यात आली आहे.
मृत्यूनंतरही सन्मानासाठी संघर्ष.!
तृतीयपंथीय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला जातो. अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याने मृतदेहावर सन्मानाने अंतिम संस्कार करणेही कठीण होते. प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या शेवटच्या प्रवासात सन्मान मिळाला पाहिजे, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या,
१)बीड शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना हक्काचे घर बांधण्यासाठी शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.
२) प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास व रमाई आवास यांसारख्या घरकुल योजनांमध्ये तृतीयपंथीय समाजाचा विशेष प्राधान्याने समावेश करावा.
३) तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमीकरिता शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.
४) कौशल्य विकास, रोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र केंद्र किंवा भवन उभारावे.
५) तृतीयपंथीय समाजावरील अन्याय रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती व तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा.
या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तृतीयपंथीय समाजाला न्याय व सन्मान मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आश्रय सेवा केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आली. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व तृतीयपंथीयांना लवकरच आपल्याला मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत यासाठी प्रशासनाची एक विशेष बैठक घेऊन आपल्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासित केले.
चौकट
स्मशानभूमीसाठी प्रशासन गांभीर्याने विचार करेल – नायब तहसीलदार सुहास हजारे
तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीसाठी बीडमध्ये स्वतंत्र स्मशानभूमी नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी बीड वरून प्रेत जर अंबाजोगाईला घेऊन जावे लागत असेल तर ते वेदनादायक आहे. आपल्या भावना लक्षात घेऊन यावर प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर मार्ग काढून बीडमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. त्यासोबतच ज्या तृतीय पंथियांकडे स्वतःच्या जागेचा पीटीआर असेल त्यांना घरकुल तसेच ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल, ज्यांना आधार कार्ड नसेल त्यांना ते तात्काळ देण्याबाबत देखील प्रशासन तत्परतेने काम करेल असे नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी आश्वासित केले.
चौकट
या संवेदनशील मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेल – गटनेते खुर्चीत आलं खुर्शीद आलम
बीड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तृतीयपंथीयांना स्मशानभूमीसाठी कुठे जागा उपलब्ध करून देता येईल का ? यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात प्रश्न मांडेल. आणि नगरपरिषदेला त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असा शब्द बीड नगरपालिकेतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक खुर्शीद आलम यांनी तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाला दिला. तसेच बीड नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील तृतीयपंथीयांची मागणी रास्त असून यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असा शब्द दिला.



