बीड
संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे भान ठेवून प्रत्येकाने जबाबदार नागरिक बनावे – प्राचार्य डॉ. शंकर धांडे

संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे भान ठेवून प्रत्येकाने जबाबदार नागरिक बनावे – प्राचार्य डॉ. शंकर धांडे
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
बीड प्रतिनिधी : दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे होते, तर उपप्राचार्य डॉ.शंकर शिवशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची तसेच लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांप्रती निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. शंकर धांडे म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. मात्र, अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्यांची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संविधानातील मूल्ये केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनातील आचार-विचार, वर्तन आणि व्यवहारात प्रतिबिंबित झाली पाहिजेत. प्रत्येकाने संविधानाचा सन्मान करून एक जबाबदार, जागरूक आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश कोंका यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



