बीड

भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानात संघर्षाची ठिणगी!

भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानात संघर्षाची ठिणगी!

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार – ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांचा निर्धार

मुंबई, ४ जुलै २०२५ (प्रतिनिधी) –पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यात आला.

या आंदोलनात भटके-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी ठळकपणे मांडण्यात आली. याशिवाय, नागरिकत्वाचे पुरावे कोणतीही अट न ठेवता देण्यात यावेत, रहिवासी शासकीय जमिनींचे मालकी हक्क देण्यात यावेत, भटक्या-विमुक्त समाजावर ऑट्रसिटी कायदा लागू करावा आणि ३१ ऑगस्टला ‘विमुक्त दिन’ म्हणून जाहीर करावे, अशा मागण्यांवर आंदोलकांनी एकमुखी जोर दिला.

आंदोलनानंतर लगेचच मंत्रालयात तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधानसभा उपसभापती मा. नीलमताई गोरे, बहुजन कल्याण मंत्री मा. अतुल सावे, सचिव मा. आप्पासाहेब धुळाज, उपसचिव मा. दिनेश चव्हाण, खासगी सचिव मा. चेतन गिरासे, OSD मा. नानासाहेब कदम यांनी सहभाग घेतला. तर संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून मुमताजताई शेख,अँड. डॉ. अरुण (आबा) जाधव, , बाबुशिंग पवार, यशवंत फडतरे, भावनाताई वाघमारे, शोभाताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत बहुजन कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, ही बैठक घडवून आणण्यात विधानसभा उपसभापती नीलमताई गोरे यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांचे संयोजन समितीने मनःपूर्वक आभार मानले.

आंदोलनाची भूमिका मांडताना अँड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले,
“जोपर्यंत भटके-विमुक्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा अखंड सुरूच राहणार आहे!”

Back to top button