बीड

“खेळातून येणारी शिस्त आणि आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतो” – नयन बारगजे

“खेळातून येणारी शिस्त आणि आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतो” – नयन बारगजे

सिंदफणा पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
माजलगाव (प्रतिनिधी): “खेळातून येणारी शिस्त आणि आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतो. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाला केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर आत्मविकासाचे साधन म्हणून स्वीकारले पाहिजे,” असे प्रेरणादायी विचार राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू नयन बारगजे यांनी सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सिंदफणा पब्लिक स्कूल, पिंपळगाव येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ च्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले.
विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या शाळेत शाळेच्या सचिव मंगलाताई सोळंके आणि समुपदेशक नीलाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे आणि राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू नयन बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जोशात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. इयत्ता पहिली ते पाचवी तसेच सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या महोत्सवात विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाची सुरुवात शाळेच्या संगीत विभागाच्या वतीने सादर केलेल्या सुरेल स्वागत गीताने मंगलमय वातावरणात झाली. या वेळी क्रीडा ध्वजारोहण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावी वर्गातील राष्ट्रीय बॉलीबॉल खेळाडू स्नेहल शिंदे हिने सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. शाळेच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन मुलींनी धगधगती प्रज्वलित मशाल आणून प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम सोळंके यांनी आपल्या केले. प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश बारगजे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “खेळातून शिस्त, सहानुभूती, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, सहकार्याची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. या गुणांच्या बळावर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.” त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांनी गेल्या वर्षभरात क्रीडा विभागाने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा आढावा सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले आणि शाळेच्या क्रीडा उपक्रमांची विशेष माहिती दिली.शाळेच्या क्रीडांगणात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या रंगतदार आणि कौशल्यपूर्ण स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साह, स्पर्धात्मकता आणि प्रामाणिक खेळाडूवृत्ती दाखवत आपले कौशल्य सादर केले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेत आपली प्रतिभा दाखवली. उपस्थित पालकांनीही विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा संचालक दीपक माने, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम सोळंके, वैशाली सोळंके, सचिन मंजुळे, शैक्षणिक विभाग प्रमुख धनंजय सोमवंशी, जी.बी. ऑगस्टन, सुनिता सुरवसे यांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी बुरुकुल आणि देवेंद्र सोळंके यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी अत्यंत कार्यक्षमतेने केले तर आभार प्रदर्शन विजया माला घाटुल यांनी केले.

Back to top button