📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड नगरपरिषदेतील मनमानी पदभारवाटपावर प्रश्नचिन्ह!

बीड नगरपरिषदेतील मनमानी पदभारवाटपावर प्रश्नचिन्ह!
मुख्याधिकारी मांडुरके यांच्या निर्णयाची चौकशी करून कारवाईची अजय सरवदे यांची मागणी
स्वच्छता निरीक्षकांच्या प्रभारी नियुक्त्यांबाबत तक्रार
बीड : बीड नगरपरिषदेतील स्वच्छता विभागाच्या  प्रभारी पदभार वाटपावरून प्रशासकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले असून, मुख्याधिकारी श्री. मांडुरके यांनी घेतलेल्या निर्णयाची सखोल चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड (पश्चिम) जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त आणि बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार सादर केली आहे.
बीड नगरपरिषदेच्या दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार श्री. भागवत जाधव, स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे संपूर्ण शहराच्या मुख्य स्वच्छता निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रभारी पदभार देताना संबंधित सेवा प्रवेश नियम, पात्रतेच्या अटी आणि प्रशासकीय अधिकारांचे पालन झाले आहे का, याची अभिलेखांच्या आधारे तपासणी करण्याची मागणी सरवदे यांनी केली आहे.
श्री. भागवत जाधव यांची यापूर्वी धाराशिव व परभणी जिल्ह्यांमध्ये बदली झाल्याची माहिती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बदल्या कोणत्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या, त्यामागील प्रशासकीय कारणे काय होती आणि त्यांना पुन्हा बीड येथे पदस्थापना कशी देण्यात आली, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छता कामगार संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रभारी स्वच्छता निरीक्षकपदाची जबाबदारी देताना संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, सेवाज्येष्ठता, अनुभव आणि नियुक्तीची विहित पद्धत विचारात घेण्यात आली होती का, असा प्रश्न तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, पात्र लिपिक संवर्गातील किंवा अन्य पात्र कर्मचाऱ्यांचा विचार न करता विशिष्ट कर्मचाऱ्यांना पदभार देण्यात आला असल्यास त्यामागील कारणे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी राज्यसेवा स्वच्छता निरीक्षक (समावेशन, नेमणुका व सेवेच्या शर्ती) नियम, २०१९ तसेच लागू सेवाशर्तींच्या आधारे नियुक्त्यांची वैधता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी श्री. मांडुरके यांनी संबंधित पदभारवाटपाचे आदेश कोणत्या नियमांनुसार काढले, त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता आवश्यक होती का आणि आस्थापना विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची पडताळणी केली होती का, याची चौकशी करण्याची मागणी अजय सरवदे यांनी केली आहे.
यासाठी बदली आदेश, बदली रद्द करण्याचे आदेश, पदभारवाटपाचा प्रस्ताव, आस्थापना विभागाचा अभिप्राय, सेवाज्येष्ठता यादी, पात्रतेची कागदपत्रे आणि सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित आदेश रद्द अथवा दुरुस्त करावेत. तसेच मुख्याधिकारी मांडुरके, संबंधित आस्थापना अधिकारी आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका निश्चित करून, दोष सिद्ध झाल्यास लागू सेवाशिस्तीच्या नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
चौकट :- नगरपरिषद प्रशासन विभागातील सह-आयुक्त हे बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे व त्यांचे मुख्याधिकारी यांच्यावर नियंत्रण नसल्याने असे गंभीर प्रकार होत आहेत. “तरी भी चूप और मेरी भी चूप” यामुळे अनियमितता व नियमबाह्य कामे होत आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन विभागातील प्रमुख यांचे देखील चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी मांडुरके यांनी काढलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा त्यांच्यावर कारवाई करावी आणि सुधारित आदेश काढत सेवाजेष्ठतेचे नियम लावून पदभार द्यावे.
— अजय सरवदे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, बीड (पश्चिम)

Back to top button