पालकमंत्री अजितदादांचा दुटप्पीपणा ; नियोजन निधी पुण्याला वाटप करून खर्चही झाला मात्र बीडकरांना डीपीसीच्या ५७५ कोटींचे निव्वळ गाजर दाखवले ; बीडला न्याय देता येत नसेल तर पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा :- डॉ.गणेश ढवळे

पालकमंत्री अजितदादांचा दुटप्पीपणा ; नियोजन निधी पुण्याला वाटप करून खर्चही झाला मात्र बीडकरांना डीपीसीच्या ५७५ कोटींचे निव्वळ गाजर दाखवले ; बीडला न्याय देता येत नसेल तर पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा :- डॉ.गणेश ढवळे
—–
बीड:- ( दि.२४ ) नियोजनाच्या निधीकडे राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या नजरा लागलेल्या असताना लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीला चांगलाच फटका बसला असुन जिल्हा वार्षिक योजना अर्थातच डीपीसीला ३ महिन्यांपासून निधी देण्यात आलेला नाही. सर्वच जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेच्या तिजोरीत खडखडाट असुन त्याचा परीणाम जिल्ह्यातील विकासकामांवर झाला आहे. बीडमध्ये महिनाभरापूर्वी अर्थमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी आढावा बैठक घेऊन चालु वर्षांतील सन २०२५-२६ या नव्या वर्षातील विकास कामांसाठी ५७५ कोटींच्या कामांची घोषणा केली.मात्र निधीअभावी अद्याप शासनाकडून एकही रुपयांचा निधी वर्ग झालेला नाही. त्यामुळे बीडकरांना केवळ ५७५ कोटींचे गाजर दाखवण्यात आले असल्याची प्रतिक्रिया उमटत असतानाच दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्याला नियोजनाच्या निधीतून ३ कोटी २० लाख रुपये वर्ग करून त्यातले १ कोटी १६ लाख रूपये खर्चही झाले आहेत. त्यामुळे पुणे आणि बीड दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादांचा दुटप्पीपणा त्यांच्या सारख्या माणसाला शोभत नसुन नाव मोठे आणि लक्षण खोटे या म्हणीप्रमाणे अजितदादांची वागणुक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली असुन बीडकरांना न्याय देता येत नसेल तर अजितदादांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
सविस्तर माहितीस्तव
—-
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका,नगरपंचायती, नावीन्यपूर्ण योजनांसाठी सर्व शासकीय विभागांना जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी वितरित केला जातो.जिल्हा वार्षिक योजनेतून हा निधी खर्च होतो.सन २०२४-२५ या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी शासनाकडुन आलेला सर्व मंजुर निधी समित्यांमार्फत खर्च करण्यात आला आहे.३१ मार्चला सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.त्यानंतर मात्र गेल्या ३ महिन्यात म्हणजेच सन २०२५-२६ या नव्या आर्थिक वर्षातील विकास कामांसाठी शासनाकडून १ रूपयाचाही निधी वर्ग झालेला नाही.त्यामुळे नियोजन समितीत कमालीची अशांतता आहे.
नियोजनच्या निधीचा पहिला हप्ता अजित पवारांच्या पुण्यालाच बीडला दमडीही नाही ; बीडला न्याय देऊ शकत नसतील तर पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा:- डॉ.गणेश ढवळे
—
अजितदादा पवार हे पुणे आणि बीड दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी नियोजनच्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचे दिसून येत आहे.पुणे जिल्ह्याला नियोजनच्या निधीतुन पहिला हप्ता ३ कोटी २० लाख वर्ग झालेला असुन त्यातले १ कोटी १६ लाख रूपये खर्चही झाले आहेत. अजितदादा पवार बीडचेही पालकमंत्री असले तरी बीडच्या खात्यावर शुन्यच अद्याप कायम असुन पुणे जिल्ह्याला नियोजन समितीच्या निधीचा ३ कोटी २० लाख रुपये वर्ग झालेला निधी तातडीच्या खरेदीसाठी होता असंही नाही तर नियोजन समिती सक्षमीकरण या हेडखाली त्यातील १ कोटी १६ लाख खर्चही झाले आहेत.याचवेळी बीड जिल्ह्यातील जलजीवन सारख्या महत्वाच्या योजनेतील ५०५ कामांचे तब्बल १३२ कोटी रुपये सुद्धा अजितदादा पवार वेळेवर देत नसल्याने जर अजितदादांना बीडला न्याय देता येत नसेल तर त्यांनी बीड पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.



