बीड
राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीच्या हरित आयोगाच्या नियामक मंडळावर एका दिवसात ७० लाख वृक्षलागवडीचा ‘रेकॉर्ड’ गाजवणाऱ्या बीड प्रशासनाला संधी द्या — डॉ. ढवळे

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीच्या हरित आयोगाच्या नियामक मंडळावर एका दिवसात ७० लाख वृक्षलागवडीचा ‘रेकॉर्ड’ गाजवणाऱ्या बीड प्रशासनाला संधी द्या — डॉ. ढवळे
बीड (दि.३०): राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी स्थापन करण्यात आलेल्या हरित महाराष्ट्र आयोगाच्या नियामक मंडळावर बीड जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्थान द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
राज्य सरकारने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी हरित महाराष्ट्र आयोगामार्फत केली जाणार आहे. आयोगाच्या नियामक मंडळात मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष तसेच वन, पर्यावरण, कृषी आणि रोजगार हमी योजना मंत्री यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे २७ लाख हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बीड जिल्हा प्रशासनाने यापूर्वी एका दिवसात ३० लाख, ६३ लाख आणि तब्बल ७० लाख वृक्षलागवडीचे ‘रेकॉर्ड’ प्रस्थापित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कामगिरीची “इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये नोंद होऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले होते.
जागेच्या उपलब्धतेबाबत राज्य सरकारने चिंता करण्याची गरज नसून कमी जागेत अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचे कौशल्य बीड प्रशासनाकडे असल्याचा दावा करत, या ‘महारथी’ अधिकाऱ्यांना हरित महाराष्ट्र आयोगाच्या नियामक मंडळावर संधी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२



