बीड

CCMP नोंदणी स्थगितीविरोधात जामखेडमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

CCMP नोंदणी स्थगितीविरोधात जामखेडमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

 

जामखेड प्रतिनिधी –महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडून सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेस स्थगिती दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जामखेड तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 9 जानेवारी 2014 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथीची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात आला. जून 2014 च्या अधिवेशनामध्ये याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. या निर्णयानुसार होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट 1960 मध्ये बदल करत होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी (सीसीएमपी) कोर्स करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1965 मध्ये सुधारणा करत, जे होमिओपॅथी डॉक्टर्स एमबीबीएस कॉलेजमधून एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स पूर्ण करतील, त्यांच्यासाठी शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येईल आणि त्यांची नोंदणी या स्वतंत्र नोंदणी पुस्तिकेमध्ये करण्यात येईल, असा कायदा संमत करण्यात आला. दिनांक 1 जुलै 2014 पासून हा कायदा राज्यामध्ये अमलात आला असून, दिनांक 8 जुलै 2024 रोजी राजपत्रामध्ये हा कायदा प्रसिद्ध करण्यात आला.

मात्र गेल्या 10 वर्षांपासून ही नोंदणी डॉक्टर्सना मिळत नव्हती. अखेर दिनांक 15 जुलै 2025 पासून ही नोंदणी देण्यात येणार असल्याचे नोटिफिकेशन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढले होते. पण अचानक इतर वैद्यक संघटनांच्या दबावापोटी राज्य सरकारने हा निर्णय स्थगित करत नोंदणी प्रक्रिया रोखली असून, एफडीए चे परिपत्रकही स्थगित केले आहे.

हा निर्णय राज्यातील जवळपास एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर मोठा अन्याय करणारा असून, ग्रामीण आरोग्य सेवेसमोर गंभीर प्रश्न उभा करणारा आहे. या पार्श्वभूमीवर 16 जुलै 2025 पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातील हजारो डॉक्टर सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील डॉक्टरांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत शासनाला विनंती केली आहे की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा प्रश्न सोडवावा.

हे निवेदन देण्यास संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत, डॉ. सुरेश काशीद, डॉ. तानाजी राळेभात, खर्डा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बिपिन लाड, डॉ. अशोक बांगर, डॉ. राजकुमार सानप, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. प्रशांत शहाणे, डॉ. मुकुंद ओमासे, डॉ. अजय यादव आदी उपस्थित होते.

Back to top button