बीड
आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर आष्टीचे नवीन बसस्थानक सुरू करण्याच्या हालचालींना वेग

आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर आष्टीचे नवीन बसस्थानक सुरू करण्याच्या हालचालींना वेग
विद्युत कामे पूर्ण; उर्वरित किरकोळ कामे तीन-चार दिवसांत पूर्ण होणार
******************
**********************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील बहुप्रतीक्षित नवीन राज्य परिवहन बसस्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता असून, आमदार सुरेश धस यांच्या सूचनेनंतर बसस्थानक कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दि. ५ जुलै २०२६ रोजी आमदार सुरेश धस यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन बसस्थानक तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ८ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापत्य व विद्युत शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानकाची सविस्तर पाहणी केली.
पाहणीदरम्यान बसस्थानकातील फॅन, ट्यूबलाईट, यार्ड लाईट, मीटर, इन्व्हर्टर आदी विद्युत सुविधांची तपासणी करण्यात आली. आवश्यक किरकोळ दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात आल्याने विद्युत विभागाकडील सर्व कामे पूर्ण झाली असून,
बस स्थानक वाहनतळ कॉंक्रिटीकरणाचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावास मंजुरी मिळताच आष्टी बस स्थानकाच्या वाहन तळाच्या काँक्रिटीकरणाचे काम चालू करण्यात येणार असून या संदर्भातील कोणतेही काम आता प्रलंबित नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय स्थापत्य विभागाशी संबंधित उर्वरित किरकोळ कामांचीही पाहणी करण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार सुरेश धस यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले असून, पुढील तीन ते चार दिवसांत ही सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जाणार आहेत.
सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आमदार सुरेश धस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आष्टीच्या नवीन बसस्थानकाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा बहुप्रतीक्षित प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याने नागरिकांमधून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.



