
पिंपळनेरसह ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या
पिंपळनेर : जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या जीवनावरही दिसू लागला आहे. इंधन दरवाढ, गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेली वाढ तसेच महिन्याला एकच सिलिंडर मिळणार असल्याच्या चर्चामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक गणिते विस्कळीत झाली आहेत. काही ठिकाणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात
सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने अनेक कुटुंबांना गॅसचा वापर कमी करावा लागत आहे. त्यातच महिन्याला मर्यादित सिलिंडर मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यामुळे घरखर्च भागविणे कठीण झाल्याने अनेक कुटुंबांनी गॅसऐवजी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. पिंपळनेर परिसरातही काही घरांमध्ये चुली पेटताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीमालाला हमीभाव मिळणे तसेच इंधनदरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. अन्यथा, येत्या काळात ग्रामीण भागातील कुटुंबांना आणखी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.


