महिलांच्या नावावर बचत गटाचा घोटाळा ; दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – डॉ. अरुण जाधव यांची मागणी

महिलांच्या नावावर बचत गटाचा घोटाळा ; दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – डॉ. अरुण जाधव यांची मागणी
चौंडी येथे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी (दि. ६ मे): अहिल्यानगर जिल्ह्यातील डी.आर.डी.ए.च्या माध्यमातून झालेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी आज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना चौंडी येथे दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, तालुका महासचिव भिमराव सुरवसे, जिल्हा युवक संघटक अमोल उघडे, युवक तालुकाध्यक्ष रोहित सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष लाला वाळके, युवक कार्यकर्ते योगेश गायकवाड, अहिल्या काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात डी.आर.डी.ए. अंतर्गत 2022 ते 2024 दरम्यान झालेल्या विविध आर्थिक अनियमिततांचा आढावा देण्यात आला आहे. यात खोट्या महिला बचत गटांमार्फत व्यवसाय व प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसा वाटप, संगणक खरेदीतील अनियमितता, CSC कडून भरती प्रक्रियेत आर्थिक लाच, लखपती दीदी योजनेतील बनावट माहिती, लोकस अॅपमधील गटांचे अनधिकृत विलोपन, महिला निवासी प्रशिक्षणाच्या नावाखाली निधीचा गैरवापर, व खासगी उद्योगांना अनधिकृतरित्या स्टॉल वाटप यांचा समावेश आहे.
डॉ. जाधव यांनी आरोप केला की, या प्रकरणात डी.आर.डी.ए., जिल्हा परिषद, पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी, संबंधित कंपन्या, तसेच महिला गट यांचा सहभाग असून, याची सखोल चौकशी व्हावी. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
जर सरकारने त्वरीत कारवाई केली नाही, तर नगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे.



