बीड

चौंडी येथून विकासाची नवी दिशा ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय

चौंडी येथून विकासाची नवी दिशा ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय

अहिल्यादेवी स्मृतिस्थळाच्या विकासासाठी ६८१ कोटींची मंजुरी

जामखेड प्रतिनिधी :- ६ मे २०२५:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रशासनिक इतिहासात प्रथमच ग्रामीण भागात, तेही सार्वजनिक स्वरूपात, मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या जतन आणि विकासासाठी ६८१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. चौंडी येथे भव्य तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थळ उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील विविध प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी ५,५०३ कोटी रुपयांची तरतूदही बैठकीत करण्यात आली. यामध्ये अष्टविनायक मंदिर, तुळजा भवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर, ज्योतिबा, महालक्ष्मी आणि माहुरगड या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आधारित बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. हा चित्रपट त्यांचे समाजसुधारणेतील योगदान आणि नेतृत्व अधोरेखित करेल.

चौंडी (अहिल्यानगर) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार असून, आरोग्य सेवांनाही बळकटी मिळेल.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्यात येईल.

तसेच, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंत विद्यार्थी योजना’ सुरू केली जाणार आहे. या योजनेंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल.

*चौकट*

या निर्णयांमुळे केवळ अहिल्यादेवींना मानवंदना नव्हे, तर ग्रामीण आणि वंचित समाजघटकांसाठी नवे भविष्य उभारण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Back to top button