बीड
एसटी प्रशासनाचा उघड दुजाभाव! लातूर-बीडला चकचकीत बस, श्रीवर्धनकरांच्या वाट्याला मात्र ‘भंगार’ लालपरी

एसटी प्रशासनाचा उघड दुजाभाव! लातूर-बीडला चकचकीत बस, श्रीवर्धनकरांच्या वाट्याला मात्र ‘भंगार’ लालपरी
श्रीवर्धन (संदेश घोलप) :
कल्याण-श्रीवर्धन मार्गावर धावणारी एसटी बस (MH 20 BL 3165) महामार्गावर अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र हा केवळ एक तांत्रिक बिघाड नसून, एसटी प्रशासनाच्या भेदभावपूर्ण आणि दुर्लक्ष करणाऱ्या धोरणाचा आणखी एक जिवंत पुरावा असल्याचा आरोप संतप्त प्रवासी करत आहेत.
एकीकडे लातूर, बीडसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर चकचकीत, सुस्थितीत आणि व्यवस्थित देखभाल केलेल्या बस धावताना दिसतात, तर दुसरीकडे मुंबई, नालासोपारा, कल्याण आणि ठाणे मार्गांवर मात्र जुनाट, खिळखिळ्या आणि रस्त्यात कधीही बंद पडणाऱ्या ‘भंगार’ बस सोडल्या जात असल्याचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्वतःच्या गावी जाणाऱ्या गाड्या — विशेषतः लातूर आणि बीड मार्गावरील — सुस्थितीत राहाव्यात यासाठी विशेष काळजी घेतली जाते, असा गंभीर आरोप स्थानिक प्रवासी करत आहेत.
यावरून एक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहे —
लातूर किंवा बीड येथे श्रीवर्धनचा एकही नागरिक नियमित प्रवास करत नसताना त्या मार्गांवरील गाड्यांची विशेष काळजी का घेतली जाते?
जर बस केवळ कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठीच चालवल्या जात असतील, तर बस डेपो हा स्थानिक नागरिकांसाठी आहे की कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याउलट कल्याण, मुंबई किंवा ठाणे आदी मार्गांवर वर्षानुवर्षे जीर्ण झालेल्या आणि तातडीच्या दुरुस्तीची गरज असलेल्या गाड्या धावत आहेत. या गाड्या वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे.
तक्रारींचा पाऊस, पण प्रशासन गप्प:
श्रीवर्धन-कल्याण मार्गावरील गाड्यांच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांनी वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात; प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही.
परिणामी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“रस्त्यात कधी बस बंद पडेल आणि तासन् तास अडकून पडावे लागेल, याचा काही नेम उरलेला नाही,” अशी खंत प्रवासी व्यक्त करत आहेत.
“श्रीवर्धनकरांनी काय गुन्हा केला?”
प्रवाशांच्या मते, जर लातूर-बीडसारख्या मार्गांवर एसटी महामंडळ सुस्थितीत बस आणि नियमित देखभाल देऊ शकते, तर कोकणातील प्रवाशांबाबत असा दुजाभाव का केला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे.
“श्रीवर्धनकरांनी काय गुन्हा केला आहे? आम्हाला सुरक्षित आणि व्यवस्थित बस सेवा मिळू नये का?” असा संतप्त प्रश्न आता प्रवासी विचारू लागले आहेत.
प्रवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, एसटी महामंडळाने सर्व मार्गांवर समान दर्जाच्या आणि सुरक्षित बस उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा या भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल.
गणेश पोलेकर (श्रीवर्धन, त्रस्त प्रवासी):-
“लांब पल्ल्याच्या सर्वच मार्गांवर व्यवस्थित गाड्या देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विशिष्ट भागाला झुकते माप देऊन श्रीवर्धनच्या प्रवाशांना दुय्यम वागणूक देणे आता सहन केले जाणार नाही.”


