बीड

श्रीवर्धन जलवाहिनी कामाचा बोजवारा; रस्त्याची साईडपट्टी खचली, जड मायनिंग वाहतुकीमुळे वाढते अपघात — प्रशासन झोपेत?

श्रीवर्धन जलवाहिनी कामाचा बोजवारा; रस्त्याची साईडपट्टी खचली, जड मायनिंग वाहतुकीमुळे वाढते अपघात — प्रशासन झोपेत?
श्रीवर्धन (प्रतिनिधी) – रानवली ते श्रीवर्धन या महत्त्वाच्या मार्गावर सुरू असलेल्या जलवाहिनी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जलवाहिनीचे काम वारंवार सुरू असून प्रत्येक वेळी रस्ता खोदला जातो; मात्र खोदकामानंतर योग्य प्रकारे मजबुतीकरण न केल्याने संपूर्ण मार्ग खड्डेमय, उखडलेला आणि धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली असून मोठे खड्डे, भेगा आणि निसटलेले कडे स्पष्ट दिसतात. केवळ माती टाकून रस्ता बंद करण्याची पद्धत अवलंबली जात असल्याने काही दिवसांतच पुन्हा तोच प्रकार उघड होत असल्याचे नागरिक सांगतात.
अपघातांची मालिका; प्रशासन मात्र मौन
जसवली तलाव परिसरात नुकतीच खडीने भरलेली सहा चाकी डंपर गाडी रस्ता खचल्याने एका बाजूला झुकून अडकली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र याच मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात आधीच घडले आहेत. वाहनचालकांना साईड घेताना चाके खचलेल्या भागात अडकण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनचालकांसाठी हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.
जड मायनिंग वाहतुकीमुळे वाढता ताण
या मार्गावरून सुरू असलेली मायनिंगची जड वाहतूक परिस्थिती अधिकच बिकट करत आहे. खडी व मुरूमाने भरलेले डंपर, ट्रक सतत धाव घेत असल्याने रस्त्यावर प्रचंड ताण पडत आहे. अरुंद रस्ता आणि खचलेली साईडपट्टी यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास क्रॉसिंग करताना अपघाताचा धोका अधिक वाढतो.
रस्त्याच्या कडेला योग्य प्रकारे साईडपट्टी व भराव न केल्याने वाहन साईडला घेताच चाके घसरतात किंवा रस्ता आणखी खचतो. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अपघातांचे प्रमाण वाढते.
शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका धोक्यात
या मार्गावरून शालेय विद्यार्थी, एसटी बस, रुग्णवाहिका तसेच रोजंदारीवर जाणारे नागरिक प्रवास करतात. रुग्णवाहिकेला उशीर होणे किंवा बस अडकणे यामुळे गंभीर परिणाम संभवतात. रात्रीच्या वेळी इशारा फलक, बॅरिकेड्स व प्रकाशयोजनेचा अभाव ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे.
नागरिकांचा संताप; चौकशीची मागणी
नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवर हलगर्जीपणाचा आरोप करत नागरिकांनी खालील मागण्या केल्या आहेत:
संपूर्ण मार्गाचे तातडीने तांत्रिक परीक्षण करावे
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी
रस्ता व साईडपट्टीचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे
जड मायनिंग वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध घालावेत
रात्रीसाठी इशारा फलक, बॅरिकेड्स आणि प्रकाशयोजना करावी
“अपघात होईपर्यंत केवळ कागदी कारवाई सुरू राहणार का? मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी
श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरी तो नागरिकांच्या जीविताच्या किंमतीवर राबवला जाऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे. मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
Back to top button