बीड
शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील शिवीगाळ व धमकीचा तीव्र निषेध

शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील शिवीगाळ व धमकीचा तीव्र निषेध
तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु – नितीन सोनवणे “पत्रकारांवर हात उठवला तर पँथर स्टाइल उत्तर देऊ”
बीड/मुंबई: शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अश्लाघ्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना निषेधार्ह असल्याची तीव्र प्रतिक्रिया ऑल इंडिया पँथर सेनेने व्यक्त केली आहे. या प्रकरणी खासदारांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागितली आहे पण आता पोलिस यंत्रणेने तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा हात लावण्याचा प्रयत्न करणे हे प्रेस फ्रीडमवरच हल्ला आहे.” सोनवणे यांनी या घटनेसाठी भारतीय दंड संहिता कलम ५०४ (अपमानजनक भाषा), ५०६ (धमकी), ५०९ (महिलांच्या सन्मानाला ठेच) आणि इतर संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे, “पत्रकारांना हात लावण्याचा प्रयत्न कुणीही केला, तर पँथर स्टाईल उत्तर दिले जाईल. शिवसेनेला पँथर चळवळीचा इतिहास चांगलाच माहिती आहे, हे विसरू नका. हे भुरटे ऑपरेशन आहे, टायगर नाही.”ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पत्रकात नितीन सोनवणे, महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष यांनी माहिती दिली आहे.पँथर सेनेने या घटनेचा गंभीरपणे निषेध करताना पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.



