बीड
दहा केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी माजी आ. भीमराव धोंडे हे दिल्लीत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित होणार

दहा केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी माजी आ. भीमराव धोंडे हे दिल्लीत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित होणार
आष्टी ( प्रतिनिधी ) :- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या ४५ वर्षात मतदारसंघात शैक्षणिक, कृषी, सामाजिक, क्रिडा, राजकीय, धार्मिक कार्य करुन जिल्हा व राज्याच्या विकासात भर घातली त्याबद्दल दिल्लीत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री हरदिपसिंग पुरी,भारत सरकारचे संचार मंत्री ना. ज्योतिरादित्य सिंधिया, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता,सिनेअभिनेत्री भूमी पेडणेकर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री ना. श्रीमती अनुप्रिया पटेल,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रतापराव जाधव, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ,माजी वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री श्रीमती स्मृती इराणी, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा.डॉ. सुधांशू त्रिवेदी इत्यादी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत नवभारत मिडिया ग्रुपच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित होणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या ४० ते ४५ वर्षात केलेल्या राजकीय, कृषी, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत नवभारत मिडीया ग्रुपने त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या ( मराठवाडा ) आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमराव आनंदराव धोंडे यांचा जन्म ५ ऑगस्ट १९५५ रोजी आष्टी तालुक्यातील रुईनालकोल या खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झाले. दररोज आठ किलोमीटर पायी जाऊन कडा येथे माध्यमिक व अहिल्या नगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतानाच त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करीत १९८० साली विधानसभा लढवली आणि अगदी कमी वयात ते आमदार झाले, सलग पंधरा वर्षे त्यांनी विधानसभा गाजवली. पुन्हा वीस वर्षांच्या खंडानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाले. वीस वर्षांच्या खंडानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे भीमराव धोंडे हे एकमेव आमदार आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या भागातील मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होते. गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी सुरूवातीला विधानसभा सदस्य झाल्यानंतर शैक्षणिक संस्था सुरू केली त्यामाध्यमातून एक दोन गावांमध्ये शाळा सुरू केल्या. हळूहळू मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शाळा महाविद्यालये व इतर शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून शिक्षणाची गंगा मतदारसंघात आणली. त्यापुर्वी अ. नगर, संभाजीनगर, पुणे येथे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या गोरगरिब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या भागातच सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे या भागाची खरोखरच शैक्षणिक क्रांती झाली आहे. पंधरा ते वीस वर्षात गावागावात शाळा सुरू केल्या. प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच वैद्यकीय कृषी,नर्सिंग, पॅरामेडिकल, इंजिनिअरिंग, फुड टेक्नॉलॉजी, पशुवैद्यकीय असे वेगवेगळे ५० पेक्षा जास्त युनिट सुरू आहेत, यामध्ये ४० हजारांहून जादा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला पंधरा वर्षे आणि नंतरचे पाच वर्ष, या २० वर्षात त्यांनी गावागावात पाझर तलाव, रस्ते,विज अशा सुविधा उपलब्ध करीत या भागाचा कायापालट केला. २०१४ मध्ये विधानसभा सदस्य झाल्यानंतर मतदारसंघातील अनेक रस्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून चकाचक रस्ते बवनले आहेत. त्यामुळे ते रस्ते महर्षी म्हणून लोकांच्या चर्चेत आले. शिक्षण महर्षी, रस्ते महर्षी, विकास महर्षी अशी अनेक बिरुदे त्यांच्या नावापुढे लागली. माजी आ. भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आष्टी ते बीड, आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते दिल्लीपर्यंत हजारो शेतकऱ्यांसह पायी मोर्चे काढलेले आहेत. त्याचप्रमाणे आज त्यांच्या शिक्षण संस्थेत सुमारे दोन हजार शिक्षक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. आपल्या परिसरातील गोरगरीबांच्या मुला मुलींना आपल्याच भागात वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय व फार्मसी महाविद्यालये सुरू केली आहेत. दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, अशा रुग्णांना ग्रामीण भागात कमी खर्चात उपचार मिळावेत याकरिता मराठवाड्यातील सर्वात मोठ्या ५०० बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला महेश सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामापासून सुरू होत आहे. शैक्षणिक संस्था व कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगारांचा रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
भविष्यात आष्टी सारख्या दुष्काळी भागात कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माजी आमदार भीमराव धोंडे यांचा मानस आहे. सुरुवातीला आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्वावर दुध संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे सुरू केली आज दोन्ही संस्था चांगल्या प्रगतीपथावर आहेत.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना खेळाची खुप आवड होती. कुस्ती आणि कबड्डी खेळाडू म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केले. आजही ते खेळाडूंना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देतात. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस हा आष्टीच्या तालमीतील पठ्ठा आहे.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करताना त्यांच्या सौभाग्यवती दमयंतीताई धोंडे यांची मोलाची साथ लाभली. मतदारसंघाचा विकास आणि
मतदारांचा विश्र्वास म्हणजेच शिक्षण महर्षी, शेतकऱ्यांचे नेते, विकास पुरुष, रस्ते महर्षी, शिक्षण सम्राट माजी आमदार भीमराव धोंडे साहेब !



