
अंबाजोगाई शहरासाठी नवीन बायपास रस्ता मंजूर करा
*आ. नमिता मुंदडा यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी*
*अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख* : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी अंबाजोगाई शहराला नवीन बायपास रस्ता मंजूर करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले असून शहराच्या विकासासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा असल्याचे अधोरेखित केले आहे.
बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी (पाटोदा ते अहमदपूर) हा सध्या अंबाजोगाई शहराच्या मध्यभागातून जातो. अंबाजोगाई शहराची लोकसंख्या एक लाखांच्या घरात असून, आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी शहरात येतात. तसेच, शहरात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री योगेश्वरी देवीचे मंदिर असल्याने राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी असते.
याव्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर नामांकित शिक्षण संस्थांमुळे मराठवाड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. यामुळे शहरात लोकसंख्येची घनता आणि वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.
शहराच्या मध्यभागातून महामार्ग जात असल्याने अवजड वाहनांची वाहतूक आणि स्थानिक वाहनांची गर्दी यामुळे शहरात सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. या कोंडीमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून, होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वर अंबाजोगाई शहरासाठी नवीन बायपास मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे नमिता मुंदडा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित मंजुरी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.



