बीड
कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत विस्तार करण्याची मागणी

कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत विस्तार करण्याची मागणी
*अंबाजोगाई प्रतिनिधी,बालाजी देशमुख:* कलबुर्गी–लातूर प्रस्तावित नवीन रेल्वे माहर्गाचा अंबाजोगाईपर्यंत विस्तार करण्याची आग्रही मागणी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या विस्तारामुळे मराठवाडा आणि कर्नाटकातील प्रमुख शहरांमधील थेट रेल्वे संपर्क सुलभ होणार असून अंबाजोगाईसह सीमावर्ती भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ७,१७९ किलोमीटर नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणासह २८ नवीन रेल्वे लाईन, दुहेरीकरण व क्षमता-वृद्धी प्रकल्पांना केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळालेली आहे. याच पार्श्वभूमीवर कलबुर्गी ते लातूर सुमारे १३९ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत सुमारे ५० किलोमीटरने विस्तार केल्यास एकूण मार्ग १९० किलोमीटरचा होईल. त्यामुळे अंबाजोगाई–लातूर–औसा–उमरगा–कलबु र्गी असा थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे.
अंबाजोगाई हे धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने या विस्तारामुळे पर्यटन, व्यापार, उद्योग, कृषी उत्पादनांची वाहतूक तसेच रोजगार व शिक्षणाच्या संधींना मोठा लाभ होणार आहे. मराठवाडा आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास वेगाने होण्यासही या रेल्वे मार्गाची महत्त्वाची भूमिका राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अंबाजोगाईकरांसाठी हा रेल्वे विस्तार ऐतिहासिक ठरेल, अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.



