बीड
संत शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव संपन्न; कुंभार समाजाकडून भक्तीचा जागर, गालसुरे गाव दुमदुमले विठ्ठल नामाच्या गजरात

संत शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव संपन्न; कुंभार समाजाकडून भक्तीचा जागर, गालसुरे गाव दुमदुमले विठ्ठल नामाच्या गजरात
श्रीवर्धन (संदेश घोलप): भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे येथे संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक वेशभूषा आणि पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या उत्सवाच्या आयोजनात स्थानिक कुंभार समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आपल्या पूर्वजांची परंपरा भक्तीभावाने आणि कौशल्याने पुढे नेणाऱ्या या समाजामुळे संपूर्ण गाव विठ्ठल नामाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर भक्तीमय झाले होते. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील अत्यंत आदरणीय संत त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गालसुरे येथील कुंभार समाजाने पुढाकार घेऊन हा उत्सव आयोजित केला होता. विशेष म्हणजे, समाजातील बांधवांनी आपल्या हस्तकलेचा वापर करून फुलांनी सजवलेली पालखी अत्यंत नयनरम्य आणि आकर्षक बनवली होती. उत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या पारंपरिक वेशभूषेत अनेक ग्रामस्थ वारकरी रूपात सहभागी झाले होते, ज्यामुळे सोहळ्याला अधिकच शोभा आली.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच्या भजनांनी आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने झाली. त्यानंतर श्री विठ्ठलाची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि लेझीमच्या तालावर निघालेल्या या पालखी सोहळ्यात आबालवृद्धांनी मोठा सहभाग नोंदवला. वेशभूषाधारी कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “संत गोरा कुंभार महाराज की जय” अशा घोषणांनी गालसुरे गावचा परिसर दुमदुमून गेला होता.
गालसुरे येथील हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून तो कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि कुंभार समाजाच्या कलात्मकतेचा जिवंत पुरावा आहे. गावातील एकजूट आणि पारंपरिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुंभार समाजाचे सदस्य सदैव तत्पर असतात. आपल्या परंपरांचा अभिमान बाळगत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी आणि समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी स्थानिक भाविक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



