बीड

चाकरवाडीत वारकर्‍यांचा कुंभमेळा आणि भक्तीचा संगम – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चाकरवाडीत वारकर्‍यांचा कुंभमेळा आणि भक्तीचा संगम – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

नेकनूर दि.11(प्रतिनिधी)ः- विसाव्या शतकातील संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचविसाव्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त भक्तीचा सागर आणि कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. केवळ सेवाभाव असल्याने इथे भाविकांची मांदियाळी जमली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले तर भवसागर तरुण जाण्याचे तंत्र माऊली दादांनी जगाला दिले. माऊली दादांनी कधीच भेदभाव केला नाही. माऊलींची सेवा करण्याचं भाग्य प्रदीप मिश्रा यांना लाभले असे प्रतिपादन ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांनी केले. माऊली दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलालाचे किर्तन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत  महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, ह.भ.प.रामभाऊ महाराज काजळे, ह.भ.प.नाना महाराज कदम, ह.भ.प.सुरेश महाराज जाधव, ह.भ.प.विठ्ठल महाराज आंधळे,  शिवानंद महाराज गिरी, दिनकर कदम, अरुण डाके, विलास बडगे, गंगाधर घुमरे, सखाराम मस्के, तानाजी कदम, नवनाथ कुलकर्णी, अरुण बोगांणे, नानासाहेब काकडे पाटील यांच्यासह लाखो भावीक भक्तांची उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती ज्ञानेश्वर माऊली दादा यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या हस्ते माऊलीच्या समाधीची आरती करण्यात आली तसेच प्रसिद्ध शिवकथाकार प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करून माजी मंत्री क्षीरसागर यांनी आशिर्वाद घेतले. कीर्तन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, संत माऊलीच्या पुण्यतिथीला दर वर्षी भक्तांचा मोठा संगम याठिकाणी पहायला मिळतो. यावर्षी तर कुंभमेळ्याचे स्वरूप दिसू लागले आहे. लाखो भाविक कथा श्रवणासाठी इथे आले रामायणाचार्य रामराव ढोक महाराज 25 वर्षांपासून अखंडितपणे सेवा करत आहेत. सुरताल आणि भक्तीचा महापूर लोटला आहे. श्रीक्षेत्र चाकरवाडीला पंढरीच्या वाळवंटाचे स्वरूप आले आहे. माऊली बालाघाटाचे आध्यात्मिक वैभव आहे. माऊलींनी सोपा मार्ग सांगितला, अंधश्रध्दे पासून दूर करण्याचं काम  माऊलीदादांनी केले आहे.
जात ना पुछो साधूकी! देखो उसका ग्यान.असा दोहा सांगितला ते म्हणाले की, इथे अनेक त्रासातून आणि संकटातून मुक्त होणारे भाविक येतात, वारकरी संप्रदाय हा फक्त भक्तीच्या मार्गावर चालतो हे माऊली प्रत्येकवेळी सांगत असत. त्यामुळे इथे प्रत्येक जातीधर्माचा भाविक जोडला गेला आहे. महिन्याची वारी करणारे हजारो भाविक आहेत. इथे सेवेकर्‍याची प्रथा खूप मोठी आहे असे सांगून त्यांनी माऊलीच्या चरणी अभिवादन केले. यावेळी उत्सवात गुलालाचे कीर्तन करताना रामराव महाराज ढोक यांनी संत सेना महाराज यांच्या
उदार तुम्ही संत।
मायबाप कृपावंत ॥1॥
या अभंगावर सुंदर चिंतन मांडले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, श्री क्षेत्र चाकरवाडीत आज भव्य दिव्य सोहळा होत आहे. सुंदर ऐश्वर्य संपन्न सोहळा होत आहे. पुण्य करणार्‍याची पुण्यतिथी होते. परोपकार, पुण्य आणि पाप दुसर्‍याला पिडा करणे आहे. माऊली दादा यांनी जगाला भवसागर तरुण जाण्याचे तंत्र दिले असे महाराज म्हणाले. यावेळी साथ संगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक राम महाराज काजळे, गायनाचार्य संतोष महाराज सुंबळे, अभिमान महाराज ढाकणे, भारत महाराज मुरकुटे, मुंडे महाराज, माऊली महाराज आवटे, सतीश महाराज जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मंडळी उपस्थित होते.

Back to top button