हैदराबाद गॅझेट नुसार एस.टी. प्रवर्गाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या विराट मोर्चात सहभागी व्हा- दिनेशराव पवार

बीड (प्रतिनिधी)- ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण दिले, त्याच गॅझेटचा आधार घेऊन आम्हा भटक्या विमुक्त बंजारा समाजास आदिवासी एस.टी. प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आज सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्या हिताच्या मागणीसाठी, लेकरा-बाळांच्या कल्याणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी बंजार समाज बांधवांनी बहुसंख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेचे उपाध्यक्ष दिनेशराव पवार यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हैदराबादच्या गॅझेटीअरच्या धर्तीवर मराठवाडा सह महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण विनाविलंब देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील बंजारा समाजाने रान पेटवले आहे. सर्वत्र विविध प्रकारचे आंदोलन करुन शासन प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी मागील तीस पस्तीस वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करुन राज्य सरकारकडे मागणी केली गेली आहे, परंतु दुर्दैवाने सरकारने समाजाच्या न्यायिक व संविधानीक मागणीला केराची टोपली दाखवली आहे. सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे बंजारा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पेठ बीड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंजारा समाजाची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेचे उपाध्यक्ष दिनेशराव पवार यांच्यासह सुशील दिनेश पवार, पांडुरंग पवार, रामभाऊ पवार, जेमा पवार, पोमा राठोड, शामा राठोड, रावसाहेब राठोड, बाबुराव पवार, प्रेमदास राठोड, मोहन राठोड, परशुराम राठोड, बाळासाहेब पवार आदींनी केले आहे.



