लिंबागणेश प्रा. आ. केंद्राची अवस्था बिकट – ५ लक्ष रुपये खर्चूनही छत कोसळले, झालेल्या कामाची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी.

लिंबागणेश प्रा. आ. केंद्राची अवस्था बिकट – ५ लक्ष रुपये खर्चूनही छत कोसळले, झालेल्या कामाची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी.
—
लिंबागणेश :- (दि.१८)बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर गतवर्षीच ५ लक्ष रुपयांचा निधी खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. तरीदेखील इमारतीची अवस्था पूर्ववतच राहिल्याने अखेर दि. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसात आरोग्य केंद्राच्या छताचा भाग कोसळला.सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
गतवर्षीच जिल्हा वार्षिक निधी २०२३-२४ मधून आरोग्य केंद्राच्या इमारतीसह इतर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, गुत्तेदाराने थातुरमातुर काम केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे निधीचा अपव्यय झाला असून कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी (१९ ऑगस्ट २०२४)च बाळंतीण सुनिता बोरखडे, रा. बोरखेड यांना पावसामुळे झालेल्या गळतीमुळे त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळीच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी रुग्णांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ दुरुस्तीचे आदेश देऊन निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.
मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली फक्त वरवरचे काम झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. छत कोसळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती फोटोसह संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ यांना दिली आहे.
ग्रामस्थांचा प्रश्न आहे की “खरंच दुरुस्ती कुठे झाली?” कारण एका वर्षाच्या आतच नव्याने दुरुस्त केलेली इमारत जीर्णावस्थेत आली आहे.
आरोग्य केंद्राची तात्काळ दुरुस्ती अथवा नवीन इमारत उभी केली नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.



