बीड
पिंपळनेर भागात कडवळ, मका ,हिरव्या चाऱ्याला वाढली मागणी

पिंपळनेर भागात कडवळ, मका ,हिरव्या चाऱ्याला वाढली मागणी
पिंपळनेर :
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तसेच बहुतांश साखर कारखान्यांच्या गाळप हंगाम संपल्याने जनावरांसाठी मकासारख्या हिरव्या चाऱ्याची मागणी दूध उत्पादकांकडून वाढू लागली आहे कारखाने सुरू असताना दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात जनावरांना हिरवाचारा म्हणून उसाच्या वाढ्याचा वापर करीत होते. त्यामुळे आतापर्यंत मका, कडवळ यासारख्या हिरव्या चाऱ्याला फारशी मागणी नव्हती. मात्र, गाळप हंगाम बंद झाल्याने बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरातील शेतकरी मका, कडवळ या चाऱ्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना यावर्षीचा गाळप हंगाम लवकर संपण्याचा अंदाज होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी नियोजन करून मका आणि कडवळ या चारा पिके घेतली आहेत. ही पिके मार्च, एप्रिल महिन्यात उपयोगात येतील. काही भागात आतापासूनच या पिकांना मोठी मागणी सुरू झाली आहे.
मका या हिरव्या चाऱ्याचा दूध उत्पादक मुरघास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतात. हा मुरघास साठवून ठेवता येतो. तो उन्हाळ्यात चार-पाच महिन्यांपर्यंत वापरता येतो. सध्या हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने दोन ते अडीच हजार रुपये भावाने मका या पिकांची विक्री होत आहे.


