शाळा गुणवत्ता मूल्यमापनामध्ये ल. ना. होशिंग विद्यालयास ‘अ+’ श्रेणी

शाळा गुणवत्ता मूल्यमापनामध्ये ल. ना. होशिंग विद्यालयास ‘अ+’ श्रेणी
अ+ श्रेणी मिळविणारे तालुक्यातील एकमेव विद्यालय
जामखेड : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने माध्यमिक शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये जामखेड येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली असून ही श्रेणी मिळविणारे तालुक्यातील एकमेव विद्यालय ठरले आहे.
शाळांची गुणवत्ता उंचावणे, संस्थात्मक सुधारणा करणे आणि पारदर्शकता आणणे या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत माध्यमिक शाळांचे स्वमूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्यासाठी शासनाने व्यापक मानकीकृत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये ‘अ+’ श्रेणी प्राप्त करून ल. ना. होशिंग विद्यालयाने तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे.
दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना १९५१ साली झाली. स्थापनेपासूनच संस्थेने या विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात हे यश संपादन करून विद्यालयाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ल.ना.होशिंग विद्यालय हे केवळ एक शैक्षणिक संस्था नसून तालुक्यातील माध्यमिक शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे हे कार्य विद्यालय अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर शाळांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली गणित लॅब सुरू करण्याचा मानही याच विद्यालयाला जातो. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘अ+’ श्रेणी मिळाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. ए. पारखे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष उद्ववराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुळवे, सचिव अरुण चिंतामणी तसेच माजी सचिव शशिकांत देशमुख आदी संस्थाचालकांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
*चौकट*
दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सर्वच क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. विद्यालयास ‘अ+’ श्रेणी मिळवून देण्यासाठी प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक-प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक बंधू-भगिनी यांचे मोलाचे योगदान आहे. भविष्यातही विद्यालयाची यशाची परंपरा व गुणवत्ता अशीच वृद्धिंगत राहो.
उद्धवराव देशमुख
अध्यक्ष – दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटी, जामखेड



