बीड
ग्रामस्थ आणि जनावरांना पिण्यासाठी तात्काळ गोदावरी पात्रातून पाणी सोडा तीव्र आंदोलनाचा बदामराव पंडितांचा इशारा

ग्रामस्थ आणि जनावरांना पिण्यासाठी तात्काळ गोदावरी पात्रातून पाणी सोडा
तीव्र आंदोलनाचा बदामराव पंडितांचा इशारा
गेवराई प्रतिनिधी :- उन्हाळ्याचे दिवस असून दररोज उष्णता वाढत आहे. त्यातच पैठण येथील नाथसागराचे पाणी सोडले जात नसल्याने गोदावरी पात्र लगत असलेल्या गेवराई तालुक्यातील अनेक गावच्या शेतकरी, ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ नाथसागरातील पाणी गोदावरी पात्रात सोडावे नसता तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी राज्य सरकारला दिला आहे.
गेवराई तालुका गोदावरी आणि सिंदफणा नदीच्या दरम्यान असला तरी नेहमीच या भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते. यावर्षीही अनेक गावातील जलस्त्रोत आटले असल्याने नागरिकांना पिण्यास पाणी नाही. त्यासोबत जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा स्थितीत पैठण येथील नाथसागरातून गोदावरी पात्रातून पाणी सोडल्यास पात्र लगत असलेल्या बहुतांश गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. अर्धा एप्रिल महिना संपत आला असून गोदापट्ट्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तात्काळ गेवराई तालुक्यात जाणाऱ्या गोदावरी पात्रात नाथसागरातील पाणी सोडावे अशी मागणी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केली असून येत्या आठ दिवसात गोदावरी पात्रात पाणी सोडले नाही तर मोठे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नाथसागरातून गोदावरी पात्रात तसेच कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यासंदर्भात माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी यापूर्वीही मोठे आंदोलन केलेले आहेत. त्यांनी दिलेला हा इशारा राज्य सरकारने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.



