बीड

जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे ; योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे ; योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

योगामुळे मुलांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ – योग शिक्षक बाळासाहेब पारखे

जामखेड प्रतिनिधी : शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे प्राचार्य आणि योग शिक्षक बाळासाहेब पारखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, तसेच पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्यांचीही उपस्थिती लाभली.

प्राचार्य बाळासाहेब पारखे सर यांनी योगासनांचे प्रकार, त्याचे फायदे आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सुखासन, ताडासन, वज्रासन, वृक्षासन तसेच अनुलोम-विलोम आणि ब्राह्मरी प्राणायाम यांचे प्रात्यक्षिके करून दाखवली आणि विद्यार्थ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

मार्गदर्शन करताना पारखे सर म्हणाले की, “आरोग्य ही जीवनाची सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. विद्यार्थी जीवनातील शिस्त संपूर्ण आयुष्यात टिकते. त्यामुळे लहान वयात योगाची सवय लावणे गरजेचे आहे.योगामुळे मुलांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ होते.शारिरीक तंदुरुस्ती ,यशाची गुरुकिल्ली आहे.टीव्ही व मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून विद्यार्थी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.”

या कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक बळीराम अवसरे सर यांच्या हस्ते प्राचार्य पारखे सर यांचा ‘शिवाजी – द मॅनेजमेंट गुरु’ पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुजाता राक्षे मॅडम यांनी पारखे सरांच्या कार्याचे कौतुक करून अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यास शुभेच्छा दिल्या.

या योग शिबिराला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पवार,उपाध्यापक प्रताप पवार,उपाध्यापिका सुजाता राक्षे, जया चौभारे,शुभांगी साळुंके,शीतल कदम, रूपाली कांबळे,संजय आरेकर तसेच पालक सतीश पवार, शुभांगीताई अडाले, राजगुरू ताई आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button