📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तलवाड्यात रात्रीचे लोडशेडिंग बदलून दिवसा वीज द्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका; ॲड. सुरेशराव हात्ते यांचे महावितरणला निवेदन

तलवाड्यात रात्रीचे लोडशेडिंग बदलून दिवसा वीज द्या
शेतकऱ्यांच्या जीविताला धोका; ॲड. सुरेशराव हात्ते यांचे महावितरणला निवेदन
तलवाडा प्रतिनिधी :
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने तलवाडा व परिसरातील शेतकऱ्यांना पिकांना विद्युत मोटारी तसेच सौरऊर्जा मोटारीच्या माध्यमातून पाणी द्यावे लागत आहे. मात्र, महावितरणकडून सध्या रात्री ९.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देताना जीविताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीचे लोडशेडिंग बंद करून दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तलवाडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सचिव ॲड. सुरेशराव हात्ते यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मंगळवारी बीड येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले. तलवाडा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याच्या दृष्टीने महावितरणने सध्या दिलेला वीजपुरवठ्याचा वेळ गैरसोयीचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रात्री ९.३० ते पहाटे ३.३० या वेळेत शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत असल्याने अंधारात सर्प, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांपासून जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे शेतकऱ्यांसाठी मोठे जोखमीचे ठरत आहे.
महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन लोडशेडिंगची वेळ बदलावी आणि शेतकऱ्यांना शक्यतो दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ॲड. सुरेशराव हात्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Back to top button