📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाणी गोदावरीत, शेतकरी मात्र कोरडाच! जायकवाडीच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा काढण्याची मागणी; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या

पाणी गोदावरीत, शेतकरी मात्र कोरडाच!
जायकवाडीच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा काढण्याची मागणी; दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या
३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास २ ऑक्टोबरपासून गेवराईच्या शास्त्री चौकात बेमुदत आमरण उपोषण
गेवराई प्रतिनिधी :
जायकवाडी धरण भरल्यापासून मागील दोन महिन्यांपासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, दुसरीकडे गेवराई तालुक्यात मागील तब्बल ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली आहेत. एकीकडे नदीत पाणी वाहत असताना दुसरीकडे जिरायती भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाला आहे. त्यामुळे गेवराई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेवराई तालुक्यातील जिरायती भागाला कायमस्वरूपी बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा काढून पाणी जिरायती भागाकडे वळवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळू शकते.
मागील ४५ दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप पिके संकटात सापडली असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने गेवराई तहसील कार्यालयात एसडीएम शुभम पवार यांना निवेदन देण्यात आले. शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून गेवराई शहरातील शास्त्री चौकात बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी विद्रोही शेतकरी राजेंद्र डाके पाटील, मच्छिंद्र गावडे, उद्धव साबळे, गजानन कोळेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
▪️ गेवराई तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
▪️ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी.
▪️ जायकवाडीच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा काढावा.
▪️ जिरायती भागात जायकवाडीचे पाणी वळवून बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण करावी.
▪️ खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
▪️ शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
Back to top button