बीड
बावीच्या माथी कचऱ्याचा डोंगर ! शिरूर कासार नगरपंचायतीचा निष्काळजी कारभार ; – शासकीय धान्य गोदामापासून अवघे ५० मीटर अंतर; उघड्यावर कचरा जाळल्याने सुरक्षेचा प्रश्न

बावीच्या माथी कचऱ्याचा डोंगर ! शिरूर कासार नगरपंचायतीचा निष्काळजी कारभार ; – शासकीय धान्य गोदामापासून अवघे ५० मीटर अंतर; उघड्यावर कचरा जाळल्याने सुरक्षेचा प्रश्न
शिरूर कासार | प्रतिनिधी
शिरूर नगरपंचायतीचा कचरा बावी गावाच्या माथी आणून टाकला जात असल्याच्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिरूर शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बावी येथील गट क्र. ८१६ मध्ये कचरा डम्पिंग केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या कचरा डेपोपासून शासकीय धान्य गोदाम अवघ्या ५० मीटरवर, तर लोकवस्ती सुमारे २०० मीटर अंतरावर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा जाळला जात असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे निर्माण होणारा धूर आणि आगीच्या ठिणग्यांमुळे जवळच असलेल्या शासकीय धान्य गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय धान्य गोदामाची प्रशासकीय जबाबदारी संबंधित महसूल प्रशासनाकडे असताना, गोदामापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर कचरा डेपो सुरू करण्यात आल्याच्या तक्रारीकडे संबंधित प्रशासनाने वेळीच गांभीर्याने लक्ष दिले का, असा सवाल उपस्थित होत आहे. कचरा जाळल्याने निर्माण होणारा धूर, आग आणि ठिणग्यांमुळे शासकीय धान्यसाठ्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती का, तसेच याबाबत तहसीलदारांकडून कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.धान्यसाठ्याजवळ अशा पद्धतीने कचरा जाळला जात असताना प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, कचरा डेपोसाठी बावी ग्रामपंचायतीची वैध ना-हरकत होती का, यावरही प्रश्नचिन्ह आहे. तसेच संबंधित कागदपत्रांमध्ये धान्य गोदामाचे अंतर ५०० मीटर दाखविण्यात आल्याचा दावा असून, प्रत्यक्षात हे अंतर केवळ ५० मीटर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे स्थळ पाहणी आणि मोजणी नेमकी कशी करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. कचरा डेपो लोकवस्तीच्या जवळ असल्याने दुर्गंधी, धूर, माशा-मच्छर आणि भटक्या जनावरांचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही या ठिकाणाची तपासणी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी अॅड. पृथ्वीराज ढाकणे यांनी विभागीय आयुक्त, नगरविकास आणि पर्यावरण विभागाकडे तक्रार करून कचरा डेपोच्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे, स्थळ पाहणी अहवाल आणि प्रत्यक्ष अंतराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विभागीय आयुक्त तसेच नगरविकास विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
चौकट : संयुक्त स्थळ पाहणीची मागणी
कचरा डेपोसंदर्भातील सर्व कागदपत्रांची तपासणी करून संयुक्त स्थळ पाहणी करण्यात यावी. कचरा डेपो, शासकीय धान्य गोदाम आणि लोकवस्ती यांमधील प्रत्यक्ष अंतराची अधिकृत मोजणी करावी. तसेच उघड्यावर कचरा जाळला जात असल्यास त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



