📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कवडगाव ते श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी पायी दिंडी सोहळा

कवडगाव ते श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी पायी दिंडी सोहळा
सद्गुरु किसन बाबा महाराज यांच्या २८व्या पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवसीय दिंडी सोहळ्याचे आयोजन
कवडगाव प्रतिनिधी : बीड जिल्हा हा संत-महंतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ माऊली दादा चाकरवाडीकर, वैकुंठवासी वामनभाऊ, भगवानबाबा, संत बंकटस्वामी महाराज तसेच श्रीगुरु संजीवन समाधीस्थ मनमतस्वामी महाराज यांसारख्या संतांच्या पावन कार्यामुळे बीड जिल्ह्याला मोठी आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये वर्षभर धार्मिक कार्यक्रम, उत्सव, भजन-कीर्तन आणि दिंडी सोहळ्यांची रेलचेल पाहायला मिळते.
याच धार्मिक परंपरेचा भाग म्हणून ह.भ.प. सद्गुरु वैकुंठवासी किसन बाबा महाराज, श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांच्या २८व्या पुण्यस्मरणानिमित्त कवडगाव ते श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी असा तीन दिवसीय पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बुधवारी सकाळी ग्रामप्रदक्षिणा करून कवडगाव येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. हरिनामाचा गजर आणि भगवंताच्या नामस्मरणात दिंडी मार्गक्रमण करीत ताडसोंना येथे पहिला मुक्काम करणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री हरी जागर भजन व पंथाचे नामस्मरण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी  नाश्ता व चहा-पाण्यानंतर दिंडी घाटसावळी मार्गे श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीकडे प्रस्थान करणार असून, दुसऱ्या दिवसाचा मुक्काम श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे होणार आहे.
दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ग्रामप्रदक्षिणा तसेच वैकुंठवासी सद्गुरु किसन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवात काल्याचे किर्तन श्रवण करून या दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. कवडगाव ते गोरक्षनाथ टेकडी या सोहळ्याचे हे सलग १५वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने दिंडी सोहळा पार पडणार आहे. हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि संतस्मरणाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेता येणार आहे.
या पवित्र दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी होऊन पायी वारीचा आणि हरिनामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन समस्त भक्तगण, कवडगाव, येथील भजनी मंडळ तसेच समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button