बीड
झेडपीत बदल्यानंतरही पुन्हा तिथेच कामकाज; पदभार काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते सरसावले

झेडपीत बदल्यानंतरही पुन्हा तिथेच कामकाज; पदभार काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते सरसावले
राष्ट्रवादीचे नेते बळीराम गवते यांचे सीईओंसह पालकमंत्री अजित दादांनाही पत्र
बीड: जिल्हा परिषदेत प्रशासकिय बदली होऊनही कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली पदभार दिले जात आहेत. तब्बल ७७ कर्मचारी दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत असल्याने संबधित विभागात अनागोंदी निर्माण झालेली आहे. यामुळे संबधितांचे अतिरिक्त पदभार काढावेत, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बळीराम गवते यांनी सीईओ आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसे सविस्तर पत्रही दिले आहे.
पत्रात म्हटले आहे, जिल्हा परिषद बीड अंतर्गत ७७ कर्मचारी यांची एकाच कार्यालयात १० वर्षापेक्षा जास्तु सेवा झालेली असल्याने शासन नियमाप्रमाणे त्यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातील कार्यालयात प्रशासकीय बदली झालेली आहे, असे असताना हे कर्मचारी विविध मार्गाने अतिरिक्त कार्यभाराच्या नावाखाली पुन्हा पुन्हा त्याच मुळ कार्यालयात कामकाज करीत आहे. अशा प्रकारचे अतिरिक्त कार्यभाराचे आदेश हे जिल्हा परिषदेतील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने निर्गमित केले जातात. हे कर्मचारी गेल्या १० वर्षापासून एकाच कार्यालयात कार्यरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता होण्यासाठी कारणीभूत आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रारी होऊन सुध्दा अधिकारी वर्ग या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. सदर प्रकरणात लक्ष घालून विविध कारणाने वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे हे अतिरिक्त कार्यभाराचे आदेश रद्द करुन त्यांना त्यांच्या मुळ आस्थापनेच्या ठिकाणी कामकाज पाहण्याबाबत आपले स्तरावरुन आदेशीत करण्यात यावे, भविष्यात अशा प्रकारच्या प्रशासकीय अनियमितता होवू नयेत, यासाठी ज्या ज्या अधिकारी/कर्मचारी यांनी असे अतिरिक्त पदभाराचे आदेश काढलेले आहेत, त्या सर्वावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही व्हावी, असेही म्हटले आहे.



