बीड
गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक उभारण्याची मागणी; मुख्यमंत्री व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन

गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक उभारण्याची मागणी; मुख्यमंत्री व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन
गेवराई | प्रतिनिधी
गेवराई शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन जालना रोड बाह्यवळण चौक ते बीड रोड बाह्यवळण चौक या दरम्यान तातडीने दुभाजक (डिव्हायडर) उभारण्यात यावा, अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य अभियंता व जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेवराई हे तालुक्याचे मध्यवर्ती शहर असून येथून बीड, माजलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच तालुक्यातील विविध भागांकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. शहरातील या मुख्य मार्गावर तहसील कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, बसस्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, राष्ट्रीयकृत व खासगी बँका असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते.
रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जालना रोड बाह्यवळण चौक ते बीड रोड बाह्यवळण चौक या संपूर्ण मार्गावर दुभाजक उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे बोर्डे यांनी नमूद केले आहे.
सन १९९८ पासून या दुभाजकाची मागणी प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित विभागाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शासनाने मानवी जीविताच्या संरक्षणासाठी तातडीने दुभाजक उभारण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



