मंडणगड एसटी आगाराकडून भाविकांसाठी विशेष पर्यटन सहलींचे आयोजन पर्यटकांच्या इच्छेनुसार मार्ग ठरवून बस उपलब्ध करून देणार – आगार व्यवस्थापक जुनेदी

मंडणगड एसटी आगाराकडून भाविकांसाठी विशेष पर्यटन सहलींचे आयोजन
पर्यटकांच्या इच्छेनुसार मार्ग ठरवून बस उपलब्ध करून देणार – आगार व्यवस्थापक जुनेदी
मंडणगड : प्रतिनिधी, दि. 24 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंडणगड आगारामार्फत भाविक व पर्यटकांसाठी विशेष धार्मिक व पर्यटन सहलींचे आयोजन करण्यात आले असून, याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवास सुखाचा, एसटी संगे या घोषवाक्याने महामंडळाच्या वतीने सर्वसामान्यांना खिशाला परवडेल अश्या तीर्थ दर्शन सहलीचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.
या विशेष सहलींमध्ये कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, गणपतीपुळे परशुराम मंदिर, मार्लेश्वर मंदिर तसेच पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि आळंदी या प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटकांच्या इच्छेनुसार स्वतंत्र मार्ग तयार करून बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडणगड एसटी आगाराचे आगारप्रमुख श्री. जुनेदी यांनी दिली. शैक्षणिक सहली, धार्मिक यात्रा, कुटुंबीयांचे गट तसेच विविध संस्थांसाठी मागणीनुसार विशेष बस सेवा देण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शवली असल्याचे आगारव्यवस्थापक जुनेदी यांनी यावेळी सांगितले. अधिक माहितीसाठी वाहतूक निरीक्षक श्रीमती प्रज्ञा दरीपकर, प्रमुख कारागीर विठोबा चौधरी मंडणगड एसटी आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



