खर्ड्यात औषध दुकानांचा कडकडीत बंद, रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरू

खर्ड्यात औषध दुकानांचा कडकडीत बंद, रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरू
जामखेड प्रतिनिधी: ऑल इंडिया केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औषध दुकान बंद आंदोलनाला खर्डा येथील केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खर्डा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सहाय्यक फौजदार रईस सय्यद व पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णुपंत आवारे यांना निवेदन देण्यात आले.
ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलती थांबवाव्यात तसेच बनावट औषधांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व टिकवणे, औषध व्यवसायात पारदर्शकता राखणे आणि रुग्णांच्या हिताचे संरक्षण करणे हा आंदोलनामागील मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खर्डा परिसरातील बहुतांश औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे औषध विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी संघटनेने विशेष खबरदारी घेत एक औषध दुकान सुरू ठेवले होते. तसेच अर्जंट औषधांची गरज भासणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवेसाठी काही संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे बंददरम्यानही गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला.
या आंदोलनात किरण वाघमारे, संतोष थोरात, अशोक हराळ, विलास भोसले, गणेश बामदळे, किशोर गाताडे, सलमान आतार, बाळासाहेब पारगावकर, निखिल डहाळे, मनोज सुरवसे, राजेश लटपटे व अवतार कोरे यांच्यासह संघटनेचे अनेक सदस्य सहभागी झाले होते.



