रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांना ज्ञानराधा ने लुटले; नियती हिशोब करते

डॉक्टरच्या बेलगाम वागण्याला आळा बसणार का? की असेच डॉक्टर लोक बेफाम वागणार? माणुसकीचा हा तिढा संपणार कधी? मेलेल्या मड्यावरील लोणी खाण्याची सवय लागलेल्या डॉक्टर चे काय करायचे? सामान्य लोकांना डॉक्टर म्हटले की अंगावर काटा येतो. हे अगदी खरंच आहे. अशी एक धास्ती बसते की, एकदा दवाखान्यात गेलो तर आता किती पैसा लागेल याची. गरीब लोकांनी तर जाण्याचा प्रश्नच नाही. वारेमाप पैसे घेऊन पण सुविधा म्हणाव्या तश्या नाहीत. एखादे ऑपरेशन असेल तर मग ती धास्ती वेगळीच असते. ऑपरेशन होण्याच्या आधीचे मेडिसीन, ऑपरेशन होतानाचे तर विचारूच नका आणि बाकी ऑपरेशन झाल्यावर फक्त मेडिसीनच ऑपरेशन च्या बिला एवढे होते. डॉक्टरांनी बेफाम वागायचं आणि आपण ते सहन करायचं एवढंच चालत आहे. यांच्या या पैसे आणि बिलांमुळे किती तरी पेशंट ने आपले होते नव्हते ते सर्व दिले. कधी ऑपरेशनच्या बिलासाठी घरदारे गेली तर कधी कर्ज करून ठेवली.
हॉस्पिटल चे बिल घ्यावेत नक्की पण त्याला काही मर्यादा असते की नाही?काही ठिकाणी तर पैसे जास्तीचे घेऊन पण सुविधा नसतात. तिथेही पेशन्ट ची फरपट. लहापणापासून ऐकत आलो की, डॉक्टर हा देवासमान असतो. देवांचा खूप लाडका असतो. प्रत्येक पेशंट ला देवाला भेटता येत नाही म्हणून त्याने डॉक्टर ला पाठविले आहे. लहानपणी किती गोड समजूत असते ना आपली. पण जसजसे आपण मोठे होतो तसे प्रत्यक्षात खरेच असते का? डॉक्टर देव असतो ही भाबडी समजूत मोठेपणी खरं आणि वास्तव स्वरूप दाखवते. पैश्यासाठी कित्येक डॉक्टर पेशंट कितीही इमर्जन्सी असला तरी पैसे भरल्याशिवाय पेशंटला हात देखील लावत नाहीत. इतका व्यवहारिकपणा असतो त्यांच्या जवळ की हेच पैसे घेऊन हे डॉक्टर करोडोची संपत्ती गोळा करतात. बिलाची पर्वा न करता जो पैसा गोळा होतो तो बँकेत, पतसंस्थेत टाकून मोकळे होतात. पण ज्या पेशंटची परिस्थिती नसताना खूप खटाटोप करून पैसा गोळा करतात अन डॉक्टर लोक हेच पैसे बँकेत टाकतात. पण नियतीचे चक्र गोल आहे ते फिरून आपल्या भोवतीच परत येते. ज्या ज्ञानराधा बँकेत याच डॉक्टर लोकांनी करोडो रुपये भरले आज ती बँक बंद पडली. यालाच नियतीचे चक्र म्हणतात. यालाच हेही म्हणतात कि, हपापाचा माल गपापा. बिल करावीत पण इतकी कि तुमच्या कडे काही वर्षांतच करोडो रुपये यावेत. तत्वांवर चालणारी डॉक्टरांची पिढी खरंच संपली का? डॉक्टर ला देव मानणारी पेशन्ट ची पिढीही संपली का? आपल्या समाजात गोरगरीब ही आहेत आणि ते एवढे बिल भरू शकत नाही म्हणून जुन्या कित्येक डॉक्टरांनी माणुसकीपायी अनेकांचे फक्त आशीर्वाद घेऊन ऑपरेशन केले आहेत पण ती पिढी सुद्धा आता संपली आहे का? किती तरी डॉक्टर ऑपरेशन आणि ऑपरेशन नंतर जी काळजी घ्यायची असते ती काळजी सुद्धा घेत नाहीत. मला मिळालेला एक अनुभव खूप वाईट आहे. इथे मी त्या हॉस्पिटल चे नाव घेत नाही.
एक वर्षापूर्वीचा अनुभव आहे. माझी आजी घरात पडली आणि तिचे इन्स्टंट ऑपरेशन करावे लागले तसे ऑपरेशन केलेही आणि ऑपरेशन चे टाके काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि वरच्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरवर घेऊन गेलोत. आत ड्रेसिंग रूम मध्ये गेलो. तिचे आता टाके काढणार म्हणून मी ही आत सोबत म्हणून गेले. टाके काढले गेले. आयोडीन घेण्यासाठी हॉस्पिटल मधील मुलगा मागे वळला. तितक्यात अगदी काही क्षणांमध्येच स्ट्रेचर निसटले आणि आजी खाली पडली नुकत्याच झालेल्या ऑपरेशनला धक्का लागला तसेच डोक्यालाही मार लागला आणि डोक्यातून खूप रक्त स्त्राव चालू झाला. डॉक्टरांनी येऊन पाहिलं काय झाले ते डोक्याला बँडेज लावून त्यांनी घाईतच एक्स-रे काढला. एक्स-रे ओके म्हणून जा म्हणाले काही जास्त जाणवलं तर कोठेतरी दाखवा म्हणाले परंतु त्या क्षणी मी डॉक्टरांना म्हटले की, खूप रक्तस्राव होतोय आणि कंबरेच्या खाली मारही लागलाय. पाय हि पूर्ण फोल्ड झालाय तर तुम्ही तीला ऍडमिट करा आणि ट्रीटमेंट द्या. मी खूप वेळेस विनंती करूनही त्यांनी जबाबदारी झटकली आणि घरी पाठवले. इतके तीला लागले होते शेवटी आम्ही तीला औरंगाबादला घेऊन गेलो. तिथे ऑपरेशन झाले परंतु बीपी खूप कमी झाल्यामुळे ती तिथेच मरण पावली. मरताना तिच्या वेदना असह्य होत होत्या. क्षणोक्षणी ती स्ट्रेचर वरून कशी, पडली कसे लागले हेच आठवत होते.
बिघडलेले स्ट्रेचर, डॉक्टराने नाकारलेली जबाबदारी, एक्सपर्ट नसलेला स्टाफ, जीवावर आल्यासारखे वागणारे तेथील कर्मचारी स्टाफ. आजही गलबलून टाकते. सतत मनात प्रश्न असतात की, नामांकित हॉस्पिटल असूनही पेशंटचे हाल होतात. हॉस्पिटल साहित्य चांगले आणि सुव्यवस्थित आहे का? हे पाहणे डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे की नाही? असे किती तरी लोक डॉक्टरांच्या अश्या हलगर्जीपणामुळे गेले-मेले असतील. आता डॉक्टर फक्त पैसे कमवायचे, पेशन्ट च्या जीवाशी खेळायचे. यांच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदार पद्धतीने वागण्याच्या पद्धतीला लगाम लागणार की नाही. जे वारेमाप बिल होतात ती या साठीच का? बेफाम सुटलेले डॉक्टर त्यांच्या नाकर्तेपणाचे बिल घेणार का? पेशन्टच्या जीवावर करोडोची संपत्ती गोळा करणारे डॉक्टर याच पेशंटशी असे निर्दयी वागणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही मी शोधत आहे.



