शाळेच्या आठवणी जपा,संस्कारच पुढचा मार्ग दाखवतील — समीर पठाण

शाळेच्या आठवणी जपा,संस्कारच पुढचा मार्ग दाखवतील — समीर पठाण
पाटोदा शाळेत चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ : विद्यार्थ्यांकडूंन ५ हजार रुपयांची भेट
जामखेड : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी आयुष्यभर जपाव्यात आणि इथले संस्कार पुढील आयुष्यात मार्गदर्शक ठरतील, असा मोलाचा संदेश माजी सरपंच समीरभाई पठाण यांनी दिला. तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत आयोजित इयत्ता चौथीच्या निरोप समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते.
आज दि. २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात चौथीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक उत्तम पवार व वर्गशिक्षक जितेंद्र आढाव यांच्या हस्ते शाळेला भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीर पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख राम निकम हे होते.यावेळी जोगेंद्र थोरात, देवा मोरे, संतोष मोरे, अमोल निंबाळकर, आशीर पठाण, सचिन टापरे, माजीद खान पठाण, परमेश्वर मोरे, प्रवीण मोरे आदी पाटोदा येथील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना समीरभाई पठाण यांनी हसत-खेळत आणि रंजक शैलीत विद्यार्थ्यांना जीवनाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व त्यांनी सांगितले. शाळेतील शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांच्या घडणीतले त्यांचे मोलाचे योगदान त्यांनी प्रभावीपणे मांडले.
यावेळी बोलताना पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम म्हणाले,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच शाळांचा विकास शक्य होतो.
यावेळी संतोष मोरे, जोगेंद्र थोरात तसेच मुख्याध्यापक उत्तम पवार,शिक्षक जितेंद्र आढाव, अनिल आष्टेकर, संतोष डोके,गीता रासने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे व भेटवस्तू देत चौथीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप दिला.चार वर्षांच्या सहवासानंतर मित्रांना निरोप देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम पवार तसेच सूत्रसंचालन संतोष डोके, तर आभार प्रदर्शन श्रीमती गीता रासने यांनी मानले.



