बीड

तळेगाव येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्याचे आयोजन

तळेगाव येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या
बीज सोहळ्याचे आयोजन
काकडा, गाथा पारायण, कीर्तन, जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार
बीड : जगाला शुद्ध भक्तीचा, समतेचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या कळसस्वरूप असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यानिमित्त तळेगाव (काकडहिरा परिसर) येथे दि. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरापासून अल्प अंतरावर असलेल्या जगद्गुरु संत श्री तुकोबाराय सेवापीठात हा सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होणार असून, यावर्षी या सोहळ्याचे पंधरावे वर्ष आहे. तुकोबारायांनी दिलेले शब्दधन म्हणजे अभंगरूपी अमृतवाणी आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्या विचारांचे बीजारोपण पुढील पिढीत व्हावे, संतविचारांचा जागर व्हावा आणि समाजात सद्भावना, समता व अध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीज सोहळ्यानिमित्त दररोज पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत काकडा, विष्णुसहस्त्रनाम, गाथा पारायण, नामचिंतन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवसभर सुरू असलेल्या या धार्मिक वातावरणामुळे परिसरात भक्तीमय चैतन्य संचारणार आहे. रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळेत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले असून ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे, त्रिंबक महाराज मातकर, भागवत महाराज मोटे, पांडुरंग महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज उबाळे, परशुराम महाराज मराडे, विजयकुमार महाराज फड आदी मान्यवर कीर्तनकार आपली सेवा सादर करणार आहेत. संत नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाऊसाहेब महाराज धांडे यांचे विशेष कीर्तन होणार असून, बीजेनिमित्त काल्याची कीर्तनसेवा ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची संपन्न होणार आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी संतांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांची क्रांती आजही समाजमनात परिवर्तन घडवून आणत आहे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत भक्ती, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. तळेगाव परिसरात मागील चौदा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या बीज सोहळ्यामुळे संतविचारांची परंपरा अधिक दृढ होत आहे. या भक्तीमय वातावरणाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच बीड जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत तुकाराम महाराज सेवापीठाचे संस्थापक परशुराम महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे.
Back to top button