जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.बळवंत वानखडे यांनी मांडले ज्वलंत प्रश्न

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अमरावती: जिल्हा नियोजन समिती अमरावतीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील विविध मूलभूत समस्या व प्रलंबित प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर सविस्तरपणे प्रकाश टाकला.
खासदार वानखडे यांनी बैठकीत मेळघाटातील तब्बल २२ गावांमध्ये अद्यापही पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा सुरू न झाल्याची गंभीर बाब मांडली. तसेच या गावांमध्ये पूर्वी कार्यान्वित असलेल्या सोलर दिवा प्रणालीची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी केली. मेळघाटातील आदिवासी बांधवांवर वन विभागामार्फत लादण्यात येणाऱ्या विविध निर्बंधांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.
यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेच्या नियोजनाबाबत, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, लासूर येथील आनंदेश्वर मंदिर विकास आराखड्यांतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अमरावती शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था हा देखील महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला.
राजकमल चौकातील विद्यमान रेल्वे उड्डाण पुलाचे निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्याबाबतही खासदार वानखडे यांनी ठाम मत व्यक्त केले. याशिवाय मतदारसंघातील इतर अनेक महत्त्वाच्या विकासात्मक बाबींवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



