महात्मा फुले युवा दलाकडून फुले दांपत्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महात्मा फुले युवा दलाकडून फुले दांपत्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी): क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या व सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या दांपत्यांचा दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा महात्मा फुले युवा दलाच्या वतीने जपली जाते.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणार्या फुले दांपत्य जीवन गौरव पुरस्कार सन 2026 27 साठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बेलखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे डॉ. नंदकुमार पालवे व सौ. आरती नंदकुमार पालवे या दांपत्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक प्रमुख अॅड. सतीश शिंदे यांनी दिली.
हा राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी एका दांपत्याला दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, फुले पगडी, साडी-चोळी आणि 11,000 रुपये रोख असे आहे.
पालवे दांपत्य गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील मानसिक रुग्णांसाठी कार्यरत आहे. रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे किंवा इतर ठिकाणी बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या मानसिक रुग्णांना शोधून त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा, समुपदेशन व उपचार पोहोचवण्याचे कार्य ते करतात. अनेक वेळा अशा रुग्णांची ओळख किंवा कुटुंब उपलब्ध नसते, तरीही त्यांना आधार देण्याचे काम हे दांपत्य सातत्याने करत आहे.
याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये मानसिक रुग्णांची काळजी घेण्यास अडचणी येतात. अशा कुटुंबांना शिधा, समुपदेशन व आवश्यक मदत पुरवून रुग्णांना बेघर होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न सेवा संकल्प प्रतिष्ठानमार्फत केला जातो.
या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पालवे दांपत्याची निवड करण्यात आली असून, एप्रिल महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती अॅड. सतीश शिंदे यांनी दिली



