पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत शेत जोड रस्त्यांसाठी सामंजस्य करार

अंजनगाव सुर्जी: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवि राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रविण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय नियोजनात विविध महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नागरी विकास आणि आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, नागरी क्षेत्राच्या विकासासाठी ७३ कोटी रुपये, तर आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी ७२ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने रस्ते विकासासाठी ३८ कोटी रुपये आणि ऊर्जा विकासासाठी ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी २७ कोटी रुपये, कृषी व संलग्न सेवा क्षेत्रासाठी ४० कोटी रुपये आणि पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत जोड रस्ते व जल पुनर्भरण योजनेंतर्गत अशासकीय संस्थेच्या माध्यमातून शेत जोड रस्ते तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व लोक जागर स्वयंसेवी संस्था, अंजनगाव सुर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सोयीस्कर रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे शेती माल वाहतुकीस चालना मिळणार आहे. तसेच जल पुनर्भरणाच्या कामांमुळे पाण्याची पातळी वाढून शेतीसाठी दीर्घकालीन फायदा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासन व अशासकीय संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणारी ही योजना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी लोकजागर स्वयंसेवी संस्था अंजनगाव सुर्जीचे समस्त पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.



