बीड
जवळा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात तीन दिवसीय जिजाऊ महोत्सव संपन्न

जवळा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात तीन दिवसीय जिजाऊ महोत्सव संपन्न
(प्रतिनिधी) आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळ बीड द्वारा संचलित ग्रामीण भागातील एक अत्यंत विश्वासपात्र शैक्षणिक संकुल म्हणून मागील चार दशकांपासून अत्यंत नावाजलेली शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जवळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात सलग तीन दिवस विविध उपक्रमांनी जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात आला.
या तीन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धे सोबत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, या वकृत्व स्पर्धेत 58 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर दुसऱ्या दिवशी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्यात विद्यार्थ्यानीं विविध 28 स्टॉल लावून, विक्री व नफा याचे गणित प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतले.
तिसऱ्या दिवशी माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून सौ. गयाबाई खांडे उपस्थित होत्या तर अध्यक्ष स्थानी श्रीमती अलका अंदुरे होत्या. या मेळाव्याच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन केले गेले.
या माता पालक मेळाव्यात म्हाळस जवळा, पिंपळगाव, म्हाळसापुर, वाकनाथपूर, रज्जाकपुर गणेशनगर या पंचक्रोशीतील तब्बल 165 महिला पालक उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या महिला पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त करत असतानाच काही उपयुक्त सूचना सुद्धा मांडल्या त्या सूचनांचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक प्रदीप गाडे यांनी स्वागत केले.या मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींचा विविध गुणदर्शन कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थी विद्यार्थिनींचे लेझीम सादरीकरण उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. मेळाव्याचे सूत्रसंचालन शंकर टेकाळे यांनी केले. शेवटी उपस्थित माता पालकांना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अंदुरे मॅडम, चव्हाण मॅडम आणि मस्करे मॅडम यांच्या हस्ते हळदीकुंकू देऊन वान देण्यात आले.
हा तीन दिवसीय महोत्सव यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक रमेश डोळे वरिष्ठ लिपिक शेख सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.


