राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत तुकाराम करांडेची झुंजार कामगिरी; बीड जिल्ह्याचा मान उंचावला

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत तुकाराम करांडेची झुंजार कामगिरी; बीड जिल्ह्याचा मान उंचावला
बीड (प्रतिनिधी) : काझीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राऊंडवर पार पडलेली 58 वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत थरारक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत देशातील अव्वल संघांनी सहभाग नोंदवला होता.
या राष्ट्रीय स्पर्धेचे बक्षीस वितरण तेलंगणाचे मुख्यमंत्री जगन्नाथ राघव रेड्डी तसेच महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. पुरुषांच्या गटात रेल्वे संघाने आपले वर्चस्व सिद्ध करत महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ करांडे तुकाराम याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सीनियर नॅशनल खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत त्याने महाराष्ट्र संघाला द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. करांडे तुकारामच्या या यशामुळे बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. खो-खो मार्गदर्शक तथा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रा.जे.पी. शेळके, एमॅच्युअर खो-खो असोसिएशन बीडचे अध्यक्ष ऋषिकेश शेळके, उपाध्यक्ष रमेश शिंदे, सचिव विजय जाहेर, कोषाध्यक्ष योगेश सोळसे, सहसचिव मनोज जोगदंड यांनी करांडे तुकारामचे अभिनंदन केले आहे



