बीड
योजनांतील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही : सभापती वैशाली बोंबले

योजनांतील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही : सभापती वैशाली बोंबले
पैठण पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल
पैठण | किरण काळे
शासनाच्या योजना केवळ फाईलपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्ष शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशा कठोर शब्दांत पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
बैठकीत आरोग्य सेवा, समाजकल्याण, घरकुल, दिव्यांग योजना, महिला बचत गट, पाणीपुरवठा तसेच कृषी विभागाच्या योजनांवर चर्चा झाली. विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांचा लाभ पोहोचण्यात होणारा विलंब आणि जनजागृतीचा अभाव यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली.
“पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सिंचन सुविधा, बियाणे व खत अनुदान यांसारख्या योजनांची माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचत नाही, ही गंभीर बाब आहे. गावपातळीवर मोहीम राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश यांनी दिले.
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून गावोगावी बैठका घ्याव्यात, शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करावे आणि लाभार्थी निवड प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी बजावले. योजनांमध्ये हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही बैठकीत देण्यात आल्याची चर्चा होती.
या बैठकीस उपसभापती संजय पाटील लघाने,प्रभारी गटविकास अधिकारी संतोष जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य प्रियंका भुजंग, अक्षय गवारे, सविता आडे, कासाबाई कोल्हे, नर्मदा नलावडे, अलकाबाई गोजरे, छाया कोठुळे, राहीबाई वाघ, उदयसेन काळे, अलकाताई सतिष शेळके, दादासाहेब गलांडे, भरत मुकुटमल, प्रमोद पन्हाळकर, प्रदीप नरके, दत्तात्रय गायके, डॉ.सखुबाई भारत झारगड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी “शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाहीत, तर संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित केली जाईल,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाला देण्यात आला.



