भराडी समाजाच्या घरकुल प्रश्नावर शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

अंजनगाव सुर्जी- नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांच्या निराकरणासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी दिनांक ३ डिसेंबर २०२५ पासून उपक्रमांना सुरुवात केली आहे.
आज तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यश गजानन लवटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुयोग खाडे आणि सुधीर देवगिरे यांनी माननीय तहसीलदार सोळंके मॅडम यांना नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केले. तहसीलदारांनी निवेदनातील सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनातील प्रमुख मुद्दा : अंजनगाव सुर्जी शहरातील भराडी समाज मागील 30–35 वर्षांपासून शहर मर्यादेत वास्तव्यास आहे. मात्र, इतक्या दीर्घ काळानंतरही त्यांना कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. विविध शासन योजनांतर्गत घरकुल मंजुरीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही लाभ मिळू शकलेला नाही. कुटुंबांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने स्थिर घरकुलाची आवश्यकता अधिक तीव्र आहे.
त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील उपलब्ध शासकीय जागेचे सर्वेक्षण करून ती जागा नाथ जोगी समाजातील पात्र कुटुंबांना देण्यात यावी, अशी ठोस मागणी निवेदनातून करण्यात आली.
या प्रसंगी शहरातील भराडी समाजातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



