बीड

पावसात गटारीचे पाणी घरात शिरले ; तपनेश्वर गल्लीतील नागरिक संतप्त, आत्मदहनाची चेतावणी

पावसात गटारीचे पाणी घरात शिरले ; तपनेश्वर गल्लीतील नागरिक संतप्त, आत्मदहनाची चेतावणी

जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील वार्ड क्रमांक ६ मधील तपनेश्वर गल्ली परिसरात
अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने नाल्याचे पाणी घराघरात घुसले. तपनेश्वर गल्ली, धर्मयोध्दा चौक परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, पोकळे वस्ती, विठ्ठल मंदिर पाठीमागील परिसर आदी भागात पावसाचे नाल्यांचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी नगर परिषदेला निवेदन देत तातडीने उपाययोजना न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

अर्जदार गणेश रत्नाकांत कोकणे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दि. २० मे रोजी झालेल्या पावसामुळे घरात गटार व पावसाचे सांडपाणी शिरले. सर्व संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. घरातील वस्तू खराब झाल्या. दुर्गंधी येऊ लागली. यापुर्वीही अशा घटना वारंवार घडल्या. नगर परिषदेला अनेक वेळा जाऊन नागरिकांनी विनंती केली. प्रत्येक वेळी पाऊस पडला की नाल्याचे व पावसाचे पाणी घरात येते. नाल्यांतील पाणी विल्हेवाट होत नाही.या पाण्यात जीवघेणे जीवजंतू असल्याने घरातील वृद्ध व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यांनी याआधीही नगर परिषदेला अनेक वेळा अर्ज करून तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नुकतेच भाजपा शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद यांनी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

समस्या तातडीने सोडवण्यात यावी, अन्यथा नागरिकांनी कुटुंबासह नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. आता नगर परिषद याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Back to top button