बीड
अंशतः अनुदानित शाळा टप्पा वाढीची अंमलबजावणी पावसाळी अधिवेशनात-उपमुख्यमंत्री अजित पवार

अंशतः अनुदानित शाळा टप्पा वाढीची अंमलबजावणी पावसाळी अधिवेशनात-उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अजित पवार यांना निवेदन
बीड दि. 20(प्रतिनिधी): १४ ऑक्टोबर २०२४ च्या विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून येत्या पावसाळी अधिवेशनात भरीव आर्थिक निधीची तरतूद करून आमचा प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार हे काल दि.19 मे रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्याचे अर्थमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेध्याशानुसार वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विनाअनुदान आणि अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढीचा निर्णय आपणच घेतला आहे. काही कारणास्तव निधी उपलब्ध झालेला नाही; परंतु येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळासह अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या भरीव अशा आर्थिक निधीची तरतूद करून वाढीव टप्प्याचे अनुदान मंजूर करून तुमचा प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ना. अजित पवार यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात वाढीव टप्प्याच्या निधीची तरतूद होऊन खूप दिवसांपासून टप्पा वाढीचा असलेला हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचे संकेतच अजित पवार यांनी दिल्याने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यात चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
ना. अजित पवार यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष श्री. जितेंद्र डोंगरे सर, बीड जिल्हाध्यक्ष श्री.आत्माराम वाव्हळ सर, श्री.शिवप्रसाद शिरसाट सर, श्री. संजय देवा कुलकर्णी आदी बहुसंख्येने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
________________________________



